राष्ट्रीय पल्सपोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत सोलापूर शहर व जिल्ह्य़ात चार लाख ८० हजार बालकांना पोलिओ लस देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. सुनील भडकुंबे यांनी दिली.
येत्या २० जानेवारी व २४ फेब्रुवारी रोजी दोन टप्प्यात पोलिओपल्स मोहिमेअंतर्गत शून्य ते पाच वर्षेपर्यंतच्या बालकांचे लसीकरण केले जाणार आहे. दोन वर्षांपूर्वी देशात पोलिओचा एक रुग्ण आढळून आला होता. त्यामुळे आणखी दोन वर्षे ही मोहीम सुरू राहणार आहे. सलग पाच वर्षे एकही रुग्ण न आढळल्यास देश पोलिओमुक्त म्हणून जाहीर केला जातो.
या मोहिमेत ठिकठिकाणी आरोग्य विभागाचे कर्मचारी व त्यांच्या मदतीसाठी अन्य यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. जिल्ह्य़ात २७७३ लसीकरण केंद्रे उभारण्यात येत असून यात सुमारे १२०० आरोग्य कर्मचारी, २७९७ शिक्षक व २७०७ अंगणवाडी सेविकांचा सहभाग राहणार आहे. या मोहिमेसाठी सुमारे सहा लाखांचा खर्च अपेक्षित असल्याचे डॉ. भडकुंबे यांनी सांगितले.