‘आविष्कार’ या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ संशोधन महोत्सवामध्ये पुणे विद्यापीठाला सर्वसाधारण विजेतेपद मिळाले आहे. कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे गुरूवारी कौतुक केले.
‘आविष्कार’ हा राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ संशोधन महोत्सव ७ ते ९ जानेवारी या कालावधीमध्ये दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये झाला. या महोत्सवामध्ये पुणे विद्यापीठाला सर्वसाधारण विजेतेपद आणि विविध ज्ञानशाखांमध्ये वैयक्तिक पारितोषिके मिळाली आहेत. या महोत्सवामध्ये राज्यभरातील २०  विद्यापीठे सहभागी झाली होती. विविध विषयांवरील ४७९ संशोधन प्रकल्प मांडण्यात आले असून त्यापैकी ७७ प्रकल्पांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. पुणे विद्यापीठाच्या ४८ प्रकल्पांपैकी २५ प्रकल्पांची अंतिम फेरीसाठी निवड झाली. सामाजिक शास्त्र, भाषा आणि कला, वाणिज्य, व्यवस्थापन, विधी आणि न्याय, मूलभूत विज्ञान, कृषी व पशुसंवर्धन या विभागांमध्ये विद्यापीठाला वैयक्तिक पारितोषिके आणि प्रावीण्य करंडक मिळाला आहे. एकूण सात पैकी पाच करंडक पुणे विद्यापीठाला मिळाले आहेत.