आंगणवाडीतील बालकांना अधिक चांगल्या दर्जाचा आहार मिळण्यासाठी तसेच गॅस दरवाढीमुळे आंगणवाडय़ातून निर्माण झालेला स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकाकडे पाठपुरावा करण्याचे अश्वासन जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी आज दिले.
कुपोषणमुक्तीसाठी शहरी व ग्रामीण भागात एकत्रिपणे, नव्या स्वरुपात, १४ नोव्हेंबर ते ७ एप्रिल दरम्यान, राबवल्या जाणाऱ्या ‘राजमाता जिजाऊ आरोग्य व पोषण अभियान’च्या जिल्हास्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी महापौर शिला शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार, जि. प. उपाध्यक्ष मोनिका राजळे, महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती हर्षदा काकडे, समाजकल्याण समितीचे सभापती प्रा. शाहुराव घुटे, सीईओ रवींद्र पाटील, राजमाता मिशनचे संचालक डॉ. राजाराम दिघे आदी उपस्थित होते.
कुपोषणमुक्तीत नगर जिल्ह्य़ाचा ग्रामीण भाग राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे, पुढील काळात शाश्वत व संपुर्ण कुपोषणमुक्तीसाठी एकत्रित प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, त्यासाठी महिला-बाल कल्याण व आरोग्य विभाग यांना वाडय़ा-वस्त्यांवर लक्ष केंद्रित करावे लागेल. जिल्हा परिषदेस चांगली परंपरा आहे, कुपोषणमुक्तीतही ही परंपरा राखली जाईल, असे लंघे म्हणाले.
कोणतीही ग्रामपंचायत, ग्रामसभा, जिल्हा परिषद तसेच समाजाकडुनही कुपोषणमुक्तीस प्राधान्य मिळत नाही, त्यासाठी चर्चा होत नाही. गावात, शहरात किती कुपोषित मुले आहेत, हे देखील माहिती नसते, कुपोषण कशाला म्हणतात हेच अनेकांना माहिती नाही, प्रश्नच माहिती नसल्याने त्यासाठी उपाय व निर्मुलनासाठी प्रयत्न केले जात नाही. मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार हे कुपोषणातुनच विकसीत झालेले विकार आहेत असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. नगर जिल्ह्य़ात जन्मत:च मुले कुपोषित असण्याचे प्रमाण ३० टक्के आहे, श्रीमंतातही हे प्रमाण २० टक्के आहे अशी माहितीही त्यांनी दिली.
महौपर शिंदे, सभापती काकडे, सीईओ पाटील, संचालक डॉ. दिघे आदींची भाषणे झाली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पावडे यांनी उपस्थितांना कुपोषणमुक्तीची शपथ दिली.
आगामी काळात माता सक्षमीकरण व कुपोषणमुक्तीसाठी गर्भधारणा ते २ वर्षांची बालके यांच्यावर लक्ष देण्यासाठी १ हजार दिवसांचे अभियान राबवले जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.