दुष्काळाने होरपळणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नवनिर्माणाच्या कामाला ‘हात’ घालायचा आहे. राज ठाकरे यांच्याविषयी युवकांत कमालीचे आकर्षण असले, तरी ते ‘मत’ मांडायला येणाऱ्या मनसेच्या आगगाडीच्या मतावर परिवर्तित कसे होणार हे मोठे आव्हान आहे. पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीचे एकाहून एक सरस वजनदार नेते व त्यांची सहकारी संस्थांची भक्कम मालिका आहे. हा चक्रव्यूह भेदून मनसेचे अस्तित्व निर्माण करणे जिकिरीचे आहे. राज ठाकरे यांच्या सोबत जे आले आहेत, येऊ पाहत आहेत त्यांचा हेतू न तपासता ‘नवनिर्माण’ करू पाहताना चुकीच्या मार्गाने वाटचाल होणार नाही ना याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.     
गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे कोल्हापुरात नेमके काय बोलणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे. शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी एकत्रित येण्याची तयारी दर्शवित राज ठाकरे यांच्याकडून टाळीची अपेक्षा व्यक्त केली आहे. त्याला प्रतिसाद द्यायचे राहिले दूर, उलट या विधानाची त्यांनी सातारा मुक्कामी खिल्ली उडविली आहे. ‘आता कोल्हापुरातच बोलेन’ असे म्हणत त्यांनी या विषयीचे रहस्य कायम ठेवले आहे. ‘मत मागायला नाही, मांडायला आलो आहे’ अशी जाहिरातबाजी करण्यात आलेल्या कोल्हापूरच्या सभेत राज ठाकरे टाळी देतात की टोला देतात हे लक्ष्यवेधी बनले आहे. राज यांची शिवसेनेविषयीची भूमिका ही त्यांच्या पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणाची उल्लेखनीय बाजू असणार आहे.    
कोल्हापुरात, खरेतर पश्चिम महाराष्ट्रात राज ठाकरे यांच्या सोबत जे कोणी आले त्यात बहुसंख्येने शिवसेनेची आयात आहे. अर्थात राज हे सेना सोडून नवनिर्माणाच्या मार्गाने जाऊ लागल्याने ते स्वाभाविक आहे. मात्र त्यांच्यासोबत सध्या जे आहेत, जे होते, जे येऊ इच्छितात त्यापैकी किती जणांना त्यांच्या विषयी मनापासून आस्था आहे, याची एकदा नीटपणे तपासणी होणे गरजेचे आहे. शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेले, हकालपट्टीच्या मार्गावर असलेले, नाटकी आंदोलन करून खिसे भरणारे, पक्षाच्या नावावर अर्थपूर्ण व्यवहार करणारे अशांची नेमकेपणाने मोजदाद झाली पाहिजे. पक्षाच्या नावावर राजकीय दुकानदारी चालविणाऱ्यांवर कडक अंकुश असला पाहिजे. स्वार्थासाठी पक्षाचे निशाण हाती घेणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचे धैर्यही हवे. अन्यथा जिल्हास्तरावरील नसत्या उठाठेवी, नेतृत्वासाठी खटाटोप करणाऱ्यातच वेळघालवू लागली, तर नवनिर्माणाची पताका पश्चिम महाराष्ट्रात फडकणे कठीण आहे, याची खूणगाठही बांधलेली बरी.    
दोन दशकांपूर्वी एक चित्र होते. बाप काँग्रेसमध्ये अन् मुलाच्या हाती शिवसेनेचा भगवा. आता बाप कोणत्याही पक्षात असला, तरी विशीतील तरुणाई राज ठाकरे यांची फॅन आहे. त्यांच्याविषयी कमालीची उच्छुकता त्यांची ठायी दिसते. साधी सायकल असो की धूम वेगाने पळणारी बाइक. तरुणांच्या वाहनांवर ‘राज-मुद्रा’ उमटलेली दिसते. तरुणांमध्ये असलेले हे आकर्षण मतामध्ये परिवर्तित होण्यासाठी सध्यातरी चांगले वातावरण आहे. पीक चांगले तरी त्याची मळणी व्यवस्थित करून योग्य ठिकाणांपर्यंत नेणे हे शेतक ऱ्यांचे खरे कसब. राजकीय शिवारात जोमाने वाटचाल करू पाहणाऱ्या राज ठाकरे यांच्या समोरही हेच खरे आव्हान आहे. करवीर निवासनी श्री महालक्ष्मीच्या साक्षीने ते आता कोणता राजकीय दंडवत घालतात याकडे नजरा वळल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackerarys meeting in kolhapur on 12 feb
First published on: 11-02-2013 at 09:07 IST