पनवेलमधील एका बारमध्ये वेटर म्हणून कार्यरत असलेल्या महिलेवर बारमधील एका ग्राहकाने बदनामी करण्याची धमकी देत सातत्याने अतिप्रसंग केले असल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. गेल्या तीन वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. अखेर त्याच्या त्रासाला कंटाळून या महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली.
पीडित महिलेच्या पतीने २००८ मध्ये आत्महत्या केल्यानंतर या महिलेने कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहासाठी पनवेलमधील एका बारमध्ये महिला वेटरची नोकरी पत्करली होती. तिला एक मुलगादेखील आहे. दरम्यान बारमध्ये येणारा ग्राहक मुकुंद नारायण क्षिरसागर हा सातत्याने तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करायचा. मात्र त्यास तिने प्रतिसाद न दिल्याने क्षिरसागर याने तिला २००९ साली पनवेलमधील एका लॉजवर भेटण्यास बोलावले. भेटायला न आल्यास ती राहात असलेल्या सोसायटीमध्ये तू बारमध्ये काम करीत असल्याचे सांगून बदनामी करेन अशी धमकी दिली होती. बदनामीच्या भेटीने लॉजवर गेलेल्या या महिलेवर क्षिरसागर याने अतिप्रसंग केला. तसेच याबाबत कोणाला सांगितल्यास मुलाला मारण्याची धमकी त्याने दिली होती. यामुळे या घटनेची तिने कुठेही वाच्यता केली नव्हती. याचाच फायदा घेत २००९ पासून आतापर्यंत क्षिरसागर याने तिच्यावर सातत्याने अतिप्रंसग केला असल्याची तक्रार या महिलेने नोंदवली आहे.