आटपाडीत दहावीतील विद्यार्थिनीवर झालेल्या बलात्कारानंतर संशयित तरुणाला पोलिसांनी मंगळवारी अटक केली. अत्याचारग्रस्त मुलीचे अपहरण करण्याचा डाव समजताच मुलीने आईसह सांगलीत येऊन पोलीस अधीक्षकांना अन्यायाची कर्मकथा सांगितल्यानंतरच आरोपीवर कारवाई झाली. वरिष्ठांकडे तक्रार केली म्हणून बुधवारी मुलीच्या कुटुंबीयांना बेदम मारहाणही झाली आहे.
    या अल्पवयीन मुलीवर वाडीवरच राहणा-या महेश जगताप नावाच्या तरुणाने लैंगिक अत्याचार केले. त्याला अन्य तीन मित्रांनी व शेजारच्या दोन महिलांनी सहकार्य केले. रविवारी रात्री मुलीच्या घराजवळ येऊन ३१ डिसेंबरला तुला पळवून नेणार असून तू याची वाच्यता केलीस तर तुझ्या पालकांना जिवंत ठेवणार नाही. लहान भावाला शाळेला जाऊ देणार नाही अशी धमकी दिली.
    मुलीने ही घटना आपल्या पालकांना सांगितली. पालकांनी आटपाडी पोलीस ठाण्यात न जाता सांगलीत येऊन भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष नीता केळकर यांना दुर्दैवी कहाणी सांगितली. त्यांनी या संदर्भात पोलीस अधीक्षक दिलीप सावंत यांची भेट घेऊन मुलीवर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली.
    यासंदर्भात विश्रामबाग पोलीस ठाण्यात मुलीची तक्रार दाखल करण्यात आली असून, आरोपी महेश जगताप व त्याला मदत करणारा जािलदर पवार या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. हा गुन्हा आटपाडी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. तक्रार दाखल होताच वाडीवर मुलीच्या नातेवाइकांना बेदम मारहाण झाली असल्याची माहिती केळकर यांनी दिली.