शिवसेना स्थापनेनंतर संपूर्ण ग्रामीण भाग असलेल्या तात्कालीन बेलापूर पट्टीत पक्ष रुजवणारे, वाढवणारे प्रकल्पग्रस्त शिवसैनिकांनी ४५ वर्षांनंतर पक्ष टिकावा यासाठी पुन्हा कंबर कसली आहे. शिवसेनेतील बंडखोरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा त्यांनी निश्चय केला आहे. ज्यांनी तारुण्यात पक्षाची पाळेमुळे रुजवली त्या आत्ताच्या वार्धक्याकडे झुकलेल्या ज्येष्ठ शिवसैनिकांना पक्ष पुन्हा जिवंत ठेवण्यासाठी झटावे लागणार आहे. नवी मुंबई पालिका निवडणुकीत अशा ३८ शिवसैनिकांनी चुकीच्या उमेदवारी वाटपाविरोधात बंड पुकारले आहे.
मराठीच्या न्याय्य हक्कासाठी ६० च्या दशकात मुंबईत शिवसेनेची स्थापना झाली आणि त्याच वेळी दिवंगत सीताराम केणी (दिवा), मदन कोटकर (ऐरोली), हरिभाऊ म्हात्रे (बोनकोडे), तुकाराम पाटील (घणसोली), अरुण सुतार (शिरवणे), गणपत ठाकूर (नेरुळ), एन. के. म्हात्रे ( कोपरखैरणे) या तरुणांनी भगवा खांद्यावर घेऊन गावोगावी शिवसेनेच्या शाखा स्थापण्यास सुरुवात केली. यात गणपत ठाकूर, अरुण सुतार, तुकाराम पाटील (दिवा) ही मंडळी शिवसेनेचे सरपंचदेखील झाले. याच काळात झालेल्या पंचायत व जिल्हा परिषद निवडणुकीत या तरुणांनी नशीब अजमावले. त्यात हरिभाऊ म्हात्रे हे एकमेव पंचायत समितीचे सदस्य म्हणून निवडून आले. त्यानंतर ७०च्या दशकात सिडकोच्या माध्यमातून सुरू झालेल्या नागरीकरणात शहरी भागात पक्ष वाढविण्याचे काम दिवंगत बुधाजी भोईर, सुरेश म्हात्रे आणि अरविंद नाईक यांनी केले. त्यानंतर बोनकोडे गावातील गणेश नाईक या तरुणाने पक्षात प्रवेश केला आणि आपल्या वेगळ्या अस्तित्वाने पट्टीतील पहिले विभागप्रमुख पद पदरात पाडून घेतले. नाईक त्यानंतर जिल्हा परिषद, विधानसभा निवडणुकींना अनेक वेळा उभे राहिले, पण विजय त्यांना हुलकावणी दाखवत रािहला होता. १९९० मध्ये नाईक यांनी काँग्रेसच्या ताब्यातून आमदारकी खेचून घेतली. त्यामुळे ९५ मध्ये पालिकेच्या पहिल्या निवडणुकीत भगवा फडकविण्यात नाईक यांना यश आले. शिवसेनेचे शहरातील हे यश चढत्या पायरीने सुरू असताना नाईक यांचे पक्षातील ग्रह फिरले आणि त्यांना घरचा रस्ता दाखविण्यात आला. त्यामुळे शिवसेनेचेही खराब दिवस सुरू झाले. पालिकेतील साधे विरोधी पक्षनेते पद पक्षाकडे राहिले नाही. केंद्र आणि राज्यात शिवसेनेची सत्ता आल्यानंतर नवी मुंबईत एकहाती सत्ता येण्याची चिन्हे निर्माण झालेली असताना शिवसेना नेतृत्वांनी उमेदवारी वाटपात कच खाल्ली आणि पक्षात फार मोठय़ा प्रमाणात बंडखोरी निर्माण झाली.
दिघ्यापासून सीबीडीपर्यंत शिवसेनेचे ३८ बंडखोर निवडणूक रिंगणात उभे असून ते पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना जाचक ठरणार आहेत. शेवंती सोडे, लक्ष्मण भेरे, समीर पाटील, बापू पोळ, जयश्री सोनावणे, राजेश मढवी, सुरेश भिलारे, सुखदेव जाधव, भावेश पाटील, नामदेव जगताप, शेखर पाटील, सीमा गायकवाड, रोहिणी माने, ललिता मढवी, राजश्री शेवाळे, संदीप राजपूत, कल्पना गायकवाड, राजेंद्र आव्हाड, हरिभाऊ म्हात्रे, श्वेता म्हात्रे, किशोर विचारे, विजय हेलकर, दर्शन भणगे, सुरेंद्र मंडलिक, सुवर्णा चव्हाण, संतोष भादे, सुभदा पाटे, सरोज ठाकूर, राजरतन शिंदे, सुजाता गुरव, कांचन रामाणे, सुनील हंडोरे, मनीषा गिरप, प्रतिभा मोरे, प्रितेश पाठारे, तेजश्री कोळी, गणेश नाईक आणि संतोष दळवी या सर्व बंडखोर उमेदवारांची एक मोट बांधण्यास शिवसेनेतील प्रकल्पग्रस्त नेते उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ म्हात्रे, भोलानाथ तुरे, शहरप्रमुख सुरेश म्हात्रे, उपशहरप्रमुख घनश्याम मढवी, बंडू पाटील यांनी या बंडखोर उमेदवारांची प्रचार करण्याची तयारी दर्शवली आहे.
हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास नेत्यांच्या स्वार्थापोटी हिरावून जाण्याची वेळ आल्याची भावना या ज्येष्ठ शिवसैनिकांनी व्यक्त केली. त्यात नवी मुंबईत शिवसेनेची सत्ता आल्यास आजूबाजूच्या पालिकांचे महत्त्व कमी होण्याची भीती ठाण्यातील नेत्यांना आहे. त्याचबरोबर नवी मुंबईत सत्ता आल्यास ‘उपऱ्या’ उपनेत्यांचे महत्त्व वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शिवसेनेत बंडखोरी व्हावी यासाठी जाणीवपूर्वक असे उमेदवारी वाटप करण्यात आल्याचाही ‘गौप्यस्फोट’ एका प्रकल्पग्रस्त नेत्याने केला. सामान्य सैनिकांना व राजकीय निरीक्षकांना कळणारी ‘गोष्ट’ ठाण्यातील नेत्यांना कळत नाही असा भाग नाही. यामागे शिवसेनेतील ‘नाथांची’ फार मोठी राजकीय खेळी असल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे शिवसेनेतील हे पाच जण असंतोषाचे जनक ठरले आहेत. हे पाचही जण प्रकल्पग्रस्त असून ज्या प्रकल्पग्रस्तांनी शिवसेना नवी मुंबईत वाढवली त्याच शिवसेनेतील दुसऱ्या पिढीला शिवसेना वाचविण्यासाठी मोर्चेबांधणी करावी लागत आहे. सर्व बंडखोर उमेदवारांना पाठिंबा देण्यामागे दोन उद्देश आहेत. त्यात एक पक्षनेतृत्वाला झालेली चूक कळावी आणि दुसरी यातील काही जण निवडून आल्यास त्यांना पुन्हा स्वगृही आणता यावे असा आहे. यातील काही जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांच्याशी संधान बांधले असून सर्व ‘बोलणी’ झालेली आहे, असे सांगण्यात येत आहे.