सरकारी नोकरीसाठी काही लोक परस्पर उद्योग करतात, त्यातून तक्रारी होतात. त्यामुळे सर्वच अधिकारी भरती प्रक्रिया टाळण्याचा प्रयत्न करतात. परंतु मागील आठ दिवसांत जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांच्या १२५ कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव जावळेकर यांनी राबविली. त्यामुळे नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या या बेरोजगारांना दिवाळीची भेटच मिळाली. भरती प्रक्रिया पारदर्शक व गुणवत्तेवर करण्यात आल्याने परस्पर कोणी भरतीसाठी व्यवहार केला असेल तर पुराव्यासह तक्रार करावी, असे आवाहन जावळेकर यांनी केले.
बीड जिल्हा परिषदेसह महसूल व इतरत्र नोकरभरती प्रक्रियेबाबत घडलेले उद्योग, तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तक्रारी सर्वश्रुत आहेत. परिणामी मागील काही वर्षांत नोकरभरती प्रक्रिया आपल्या कार्यकाळात होऊ नये, अशीच बहुतेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिका राहिली आहे. मात्र, त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार तरुणांवर नोकरीच्या संधीसाठी ताटकळत राहावे लागण्याची वेळ ओढवते. या पाश्र्वभूमीवर बीड जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी जावळेकर यांनी मागील ८ दिवसांत विविध पदांच्या १२५ जागा भरल्या. त्यामुळे वर्षांनुवष्रे नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या १२५ बेरोजगारांना नोकरीची ‘दिवाळी भेट’ मिळाली. भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शकरीत्या व गुणवत्तेवर करण्यात आली. त्यामुळे या प्रक्रियेबाबत परस्पर कोणी काही व्यवहार केले असतील तर पुराव्यासह थेट आपल्याकडे तक्रार करावी, असे आवाहनच जावळेकर यांनी केले.
परिचर भरतीत ११० लोकांची भरती करण्यात आली. प्रश्नपत्रिका काढताना गोपनीयता बाळगण्यात आल्याने भरती शांततेत व सुरळीत झाली. त्यानंतर अनुकंपा धर्तीवर नोकरीसाठी प्रतीक्षेत असलेल्या १५ अर्जदारांना सरळसेवा भरतीने नोकरीत सामावून घेण्यात आले, असेही त्यांनी सांगितले. जावळेकर यांच्याबाबत गेल्या काही दिवसांपासून बदल्या व पदोन्नत्यांसंदर्भात अनेक तक्रारी करण्यात आल्या. त्यातून त्यांची विभागीय कार्यालयाकडून चौकशीही करण्यात आली. असे असतानाही जावळेकर यांनी ही भरती प्रक्रिया पूर्ण करताना कोणी कितीही तक्रारी केल्या, तरी सकारात्मक काम करण्याचा प्रयत्न करणार असल्याचेच दाखवून दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Recruitement process is transparent jawalekar
First published on: 03-11-2013 at 01:50 IST