शहरातील २ हजार ३५० व्यापाऱ्यांनी स्थानिक संस्था कर अंतर्गत महानगरपालिकेत नोंदणी केली असून पाच बॅंकांच्या खात्यांमध्ये एलबीटीचे ६० लाख रुपये जमा झाले आहेत. दरम्यान, एलबीटी चुकविण्यासाठी बहुतांश व्यापाऱ्यांनी गोदामासह दुकानदारी पालिका क्षेत्राबाहेर ताडाळी, चौराळा या गावात हलविणे सुरू केले आहे. एलबीटी कराचा आकडा वाढविण्यासाठी पालिकेने व्यापाऱ्यांना नोंदणी करण्याचे आवाहन करून २० डिसेंबपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे.
राज्य शासनाने महापालिका कार्यक्षेत्रात येणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी स्थानिक संस्था कर लागू केलेला आहे. हा कर तातडीने भरावा, असे आवाहन पालिकेने केल्यानंतरही व्यापाऱ्यांनी सुरुवातीला टाळाटाळ केली. हा कर रद्द करावा, या मागणीसाठी ऑगस्ट महिन्यात बेमुदत म्हणजे सलग दहा दिवस शहरातील बाजारपेठ बंद राहिल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मध्यस्थीने मुख्यमंत्र्यांनी १ नोव्हेंबपर्यंत मुदतवाढ दिली. ही मुदत संपताच पालिकेने एलबीटी वसुलीला सुरुवात केली असून सलग तीन दिवस शिबिराचे आयोजन करून २ हजार ३५० व्यापाऱ्यांची नोंदणी करून घेतली. सुरुवातीला एलबीटीला विरोध करणाऱ्या व्यापाऱ्यांनी नंतर रांगेत उभे राहून नोंदणी केली. आता या सर्व व्यापाऱ्यांना एलबीटी जमा करण्यासाठी शहरातील बॅंक ऑफ महाराष्ट्र, बॅंक ऑफ इंडिया, ओरिएन्टल बॅंक ऑफ कॉमर्स, अ‍ॅक्सीस बॅंक, पंजाब नॅशनल बॅक व भारतीय स्टेट बॅंक या पाच बॅंकांमध्ये पालिकेचे खाते उघडून देण्यात आले आहे. व्यापाऱ्यांनाही या खात्यात परस्पर एलबीटी जमा करायचा आहे.
नोव्हेंबरचा एलबीटी १० डिसेंबपर्यंत जमा करायचा असल्याने आतापर्यंत पालिकेच्या पाचही खात्यात ६० लाख रुपये जमा झाल्याचा अंदाज आहे. या रकमेत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पालिकेने २० डिसेंबपर्यंत मुदतवाढ दिलेली असून या मुदतीत उर्वरित व्यापाऱ्यांना नोंदणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. आताही व्यापारी एलबीटीची नोंदणी करत असले तरी बहुतांश व्यापाऱ्यांनी दुकानदारी ताडाळी व चौराळा या भागात हलविण्यास सुरुवात केलेली आहे. या शहरालगतच्या वीस गावांचा महापालिका क्षेत्रात समावेश करावा, असा प्रस्ताव पालिकेने शासनाकडे पाठविलेला आहे. यावर लवकरच सकारात्मक निर्णय होणार असल्याने बहुतांश व्यापाऱ्यांनी महापालिका क्षेत्रापासून दूर व शहरालगत ताडाळी, चौराळा, एमआयडीसी, तसेच पठाणपुरा गेटबाहेरील गावांमध्ये दुकानदारी हलविणे सुरू केले आहे. कापड, कृषी औजारे, किराणा सामानांवर एलबीटी आहे. तो चुकविण्यासाठी व्यापाऱ्यांनी ही युक्ती शोधून काढली आहे. शहरातील बहुतांश व्यापाऱ्यांनी वेगळी फर्म तयार करून संपूर्ण व्यापार चंद्रपूरबाहेर नेलेला आहे. दुचाकी व चार चाकी वाहनांवर एलबीटी चार टक्के असल्याने मोठय़ा वाहनांच्या शो-रूमही महापालिका हद्दीबाहेर जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पहिल्या महिन्यात एलबीटीची चांगली रक्कम बॅंकेत जमा झालेली असली तरी स्थानिक व्यापार शहराबाहेर जात असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.     
रविवारी व्यापाऱ्यांसाठी शिबीर
एलबीटीबाबत व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम असल्याने चेंम्बर ऑफ कॉमर्स, इन्कमटॅक्स बार असोसिएशन व सेल टॅक्स प्रॅक्टीशनर्सच्या वतीने १६ डिसेंबरला राजीव गांधी भवनात व्यापाऱ्यांसाठी शिबिराचे आयोजन केलेले आहे. सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत शहरातील व्यापाऱ्यांनी हजर राहावे, असेही कळविण्यात आले आहे.