अधिकाधिक उद्योगधंदे महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत असतानाच नागपूर जिल्ह्य़ातील मौदा येथील पॉलिस्टर धागा उत्पादन करणारा कारखाना बंद पडण्याच्या मार्गावर असून २३५ कामगारांवर उपासमारीचे संकट कोसळणार आहे. त्यामुळे हा कारखाना सुरू ठेवण्यासाठी मालकाला राज्य सरकारने विनंती करावी, अशी मागणी या कारखान्यातील कामगारांनी पत्रपरिषदेतून केली आहे.
मौदा येथे १९८९ मध्ये पॉलिस्टर धागा उत्पन्न करणारी डी.सी.एल. पॉलिस्टर लिमिटेड ही कंपनी स्थापन करण्यात आली. वर्ष २००० मध्ये ही कंपनी रिलायन्स कंपनीला विकली. यानंतर या कंपनीचे नामकरण ‘रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड’ असे करण्यात आले. गेल्या २५ वर्षांंपासून येथील सर्व कामगार या उद्योगाच्या भरभराटीसाठी काम करत होते. २०११ मध्ये या उद्योगाला ब्रिटीश सेफ्टी कौन्सिल व रामकृष्ण बजाज अवार्डसारखे पुरस्कार प्राप्त झाले. परंतु कंपनीच्या व्यवस्थापनाने बाजारातील धाग्याची मागणी आणि किंमत कमी झाल्याची कारणे समोर करून १२ सप्टेंबर २०१४ पासून उत्पादन पूर्णपणे बंद केले. त्याची कोणतीही पूर्वसूचना अथवा माहिती कामगारांना दिली नाही. उत्पादन बंद केले असले तरी कंपनी कामगारांना वेतन देत आहे. परंतु काम न करता कंपनी किती दिवस वेतन देणार, असा प्रश्न भारतीय पॉलिस्टर कामगार संघटनेचे अध्यक्ष नीलकंठ रारोकर यांनी याप्रसंगी उपस्थित केला.  
डिसेंबर २०१४ मध्ये अधिकारी वर्गाच्या जवळपास १०० पैकी ५० कर्मचाऱ्यांना सिल्वासा, पाताळगंगा, बाराबांकी येथील कारखान्यात पदोन्नतीच्या नावाखाली पाठवले आहे. कंपनी मालकाने सिल्वासा येथे मोठय़ा प्रमाणात पॉलिस्टर धाग्याचे उत्पादन सुरू केले आहे. मौदा येथील कारखाना बंद करून येथील धाग्याची मागणी सिल्वासा येथील कारखान्याला दिली आहे. मौदा येथील कारखान्यात मेंटेनन्सची कामे सुरू असल्याने उत्पादन बंद करण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी अशाप्रकारची कोणतीही कामे कंपनीत सुरू नाहीत. येथील उत्पादन बंद होऊन आठ महिने झाले तरी व्यवस्थापनाकडून पूर्ववत चालू करण्याच्या उद्देशाने कोणतेही पाऊल उचललेले दिसत नाही. सध्या आमचे वेतन सुरू असले तरी ते केव्हाही बंद होऊ शकते, अशी भीती याप्रसंगी व्यक्त करण्यात आली.
या कारखान्यातील उत्पादन सुरूकरण्यात यावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, खासदार कृपाल तुमाने, कामगार व उद्योग मंत्री, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, क्षेत्रीय कामगार आयुक्त, कामगार अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून निवेदने दिली. परंतु एकाही अधिकारी अथवा लोकप्रतिनिधींनी आम्हाला योग्य प्रतिसाद दिला नाही. चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक बैठक आयोजित केली होती. तेव्हा कारखान्याचे उपाध्यक्ष कार्तिक मेहता यांनी हा कारखाना लवकरच सुरू करणार असल्याची माहिती दिली.
त्याला तीन महिन्याचा कालावधी लोटून गेला तरी प्रत्यक्ष कारखाना सुरू होण्याचे कोणतेही चिन्हे दिसत नाही. त्यामुळे आमच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. कंपनीतील उत्पादन सुरू करण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावे, असेही रारोकर याप्रसंगी म्हणाले. यावेळी संघटनेचे सचिव संजय मदनकर, सहसचिव मोतेवार उपस्थित होते.