श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याने वीज प्रकल्पासाठी राज्य सहकारी बँकेकडून घेतलेल्या ५९ कोटी रुपये कर्जापैकी ३० कोटी कर्जाची परतफेड केली आहे. तर पाच टक्केप्रमाणे ९ कोटी रुपये पर्चेस टॅक्स माफ झाला आहे. प्रकल्पातून साडेचार कोटी वीज युनिट या वर्षी निर्यात करून पश्चिम महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचा वीज प्रकल्प असल्याचे सिद्ध केले आहे, असे प्रतिपादन या कारखान्याचे अध्यक्ष आमदार के. पी.पाटील यांनी मंगळवारी व्यक्त केले. कारखान्याच्या ५५व्या वार्षिक सर्वसाधारण सभेवेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या सभेत ९७व्या घटनादुरुस्तीला टाळय़ांच्या गजरात सभासदांनी मंजुरी दिली.     
बिद्री येथील कारखान्याच्या कार्यस्थळी झालेल्या सभेवेळी आमदार पाटील म्हणाले, कारखान्याच्या वीज प्रकल्पाबाबत विरोधकांनी उलटसुलट अफवा पसरवल्या आहेत. मात्र त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. २००८ साली तयार केलेल्या या प्रकल्पाच्या उभारणीत अनेक अडचणी आल्या असल्या तरी संचालक मंडळाने तो नेटाने उभा केला आहे. वीजनिर्मितीमध्ये बिद्री कारखान्याने दिलेले योगदान मोलाचे ठरले आहे. बाजारामध्ये साखरेचे दर ३३०० रुपये क्विंटल असताना बिद्रीने २५०० रुपये प्रतिटन विनाकपात पहिली उचल जाहीर केली. मात्र हा दर २८०० रुपयांपर्यंत पोहोचल्याने दुरावा रक्कम काढण्यासाठी कारखान्याला अडचणी आल्या आहेत.    
कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांचा उल्लेख करून आमदार पाटील म्हणाले, येत्या काही दिवसांत कामगारांच्या फिटमेंटचा प्रश्न सोडवला जाणार आहे. मात्र नोकर भरतीबाबत शाश्वती दिली जाणार नाही. दैनंदिन रोजंदारी काही प्रमाणात वाढ करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. छत्रपती शिवरायांचा पुतळा तयार आहे. मात्र उभारणीसाठी जागा निश्चित नसल्याने रखडलेले हे काम लवकरच मार्गी लावले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.     
नवीन कायद्यानुसार सभासद आर्थिक क्रियाशील असला पाहिजे, पंचवार्षिकमध्ये सभासदांनी किमान तीन वर्षे ऊसपुरवठा केला पाहिजे. या बंधनकारक बाबींची माहिती सभेमध्ये देण्यात आली. कारखान्याची आर्थिक स्थिती सुदृढ असल्याचे साखर आयुक्त विजय सिंघल यांच्या पत्राचे वाचन करण्यात आले. कारखान्याचे संस्थापक व्ही. टी.पाटील यांचे तैलचित्र प्रधान कार्यालयात लावावे, तांबाळे साखर कारखाना बिद्रीने भाडेतत्त्वावर चालविण्यास घ्यावा, फराळे येथे होणाऱ्या नियोजित साखर कारखान्यास विरोध करावा अशा सूचना सभासदांनी मांडल्या. प्रास्ताविक कार्यकारी संचालक आर. डी. देसाई यांनी तर अहवाल वाचनसचिव एस. जी. किल्लेदार यांनी केले. उपाध्यक्ष ए. वाय.पाटील यांनी आभार मानले.