जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज धरणे आंदोलन
शहर बस सेवा चालवणाऱ्या खासगी ठेकेदार कंपनीने शहरातील अवैध रिक्षा व्यावसायिकांच्या विरोधात आवाज उठवल्यानंतर आता जिल्हा रिक्षा पंचायतीनेही त्यांना साथ दिली आहे. सुरळीत वाहतूकीला अडथळा ठरत असलेल्या अवैध सहा आसनी रिक्षा व्यावसायिकांच्या विरोधात असा आवाज उठत असताना शहरातील सगळेच राजकीय पक्ष व त्यांचे पुढारी मात्र शांत आहेत.
रिक्षा पंचायतीने यासंदर्भात थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच नोटीस बजावली आहे. उद्याच (दि.२०) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सर्वश्री सुभाष जंबूरे, उस्मान पठाण, शाहुराव लंगोटे, दत्तात्रय साबळे, विजय शेलार, ताजोद्दीन मोमीन, लतीफ शेख, अशोक औशीकर, रमेश आळकुळे, बाळू शहापूरकर, नासीर पठाण, हरिभाऊ हराळे, बाबा पटेल, प्रकाश तोडमल, कानिफनाथ पडोळे आदींनी ही नोटीस दिली आहे.
पोलीस व आर. टी. ओ. यांच्या आशिर्वादाने शहरात तब्बल ४ हजार अ‍ॅपे रिक्षा अवैधपणे व्यवसाय करत आहेत. त्यामुळे कायदेशीर असलेल्या तीन आसनी रिक्षाचालकांवर उपासमारीने मरण्याची वेळ आली आहे. दिवसाला फक्त २०० रुपयांचा व्यवसाय होतो. त्यातील १०० रूपये इंधनासाठी जातात. सरकारला द्यावा लागणाऱ्या करांचा विचार करता वर्षांला १० ते १२ हजार रूपये
जमा करावे लागतात. वाढत्या महागाईमुळे आधीच जगणे अशक्य झाले असताना त्यात या अवैध
रिक्षा वाहतूकीने जेरीस आणले असल्याचे नोटीशीत नमुद करण्यात आले आहे.
सहा आसनी अ‍ॅपे रिक्षांना शहर हद्दीत व्यवसाय करण्यास कायद्यानेच बंदी आहे. तरीही शहरात सर्रासपणे या रिक्षा धावत असतात. त्यामुळे आधीच चिंचोळ्या असलेल्या रस्त्यावरील वाहतूक पुर्णपणे विस्कळीत होत असून शहराच्या मध्यवर्ती भागातील सगळ्याच प्रमुख रस्त्यांवर रोज वाहतूकीची कोंडी होत असते. शहर वाहतूक शाखेच्या पोलीसांच्या डोळ्यासमोर अशी वाहतूक होत असूनही ते कारवाई करत नाही व आर. टी. ओ. कार्यालयाने तर याकडे डोळेझाकच केली आहे.
शहर बस वाहतूकीला या सगळ्याचा त्रास होत असल्याने त्यांनी मध्यंतरी थेट मनपाला नोटीस देत शहर बस सेवा बंद करण्याची तंबी दिली आहे. अवैध रिक्षा व्यावसायिकांवर कारवाई व्हावी यासाठी मनपाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस, जिल्हा प्रशासनावर दबाव आणावा अशी त्यांची मागणी आहे. मात्र नोटीस दिल्यानंतरही मनपात यासंबधाने अद्याप काहीच हालचाल झालेली नाही.