‘हिट अ‍ॅण्ड रन’ प्रकरणामध्ये बॉलीवूड अभिनेता सलमान खानला शिक्षा सुनावल्यावर बॉलीवूडकरांनी याबद्दल संमिश्र प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली होती. कित्येकांनी त्यासाठी ट्विटरचा आधार घेतला. या वेळी गायक अभिजीत भट्टाचार्यनेही सलमानच्या मागे राहत पदपथावर कुत्रे झोपतात, त्यामुळे त्यांना कुत्र्यांचे मरण येणारच असे ट्वीट केले. त्याच्या या ट्वीटची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा झाली. ज्येष्ठ अभिनेता ॠषी कपूर यांनी ‘सध्या यांच्याकडे काहीच काम उरले नसल्याने यांना चमचेगिरी करण्यात रस आहे’ अशा आशयाचे ट्वीट करून अभिजीतची कानउघाडणी केली.
सलमान खानवरील गुन्हा सिद्ध होऊन त्याच्या शिक्षेची सुनावणी झाल्यावर सोनाक्षी सिन्हा, अर्जुन कपूर, रितेश देशमुख अशा बॉलीवूडच्या अनेक मंडळींनी ट्विटरच्या माध्यमातून आपली मते मांडली. त्यामुळे बुधवारी बराच काळ सोशल मीडियावर सलमान खान समर्थक आणि सलमान खानचे विरोधक या द्वंद्वाला सुरुवात झाली होती. गायक अभिजीतनेही संधीचा फायदा घेत ट्विटरवर रस्ते आणि पदपथ हे चालण्यासाठी असतात, झोपण्यासाठी नव्हे. त्यामुळे रस्त्यावर झोपणाऱ्यांचा जीव गेला तर त्यात चालकाचा दोष नसतो, असे त्याचे म्हणणे होते. तसेच मुंबईमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याकडे राहण्यासाठी घर नव्हते, तरी आपण कधीच फुटपाथवर झोपलो नसल्याचे त्याने सांगितले. अभिजीतच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर टीका करण्यात आली. ज्येष्ठ अभिनेता ॠषी कपूरनेही संतप्त होऊन त्याची तिखट शब्दांमध्ये कानउघाडणी केली. अभिजीतसारख्या कित्येक जणांकडे सध्या काहीही काम नाही, त्यामुळे केवळ सलमानची चमचेगिरी करण्यासाठी त्यांनी असे म्हटल्याचे त्यांनी सांगितले.
सलमानवरील शिक्षेच्या सुनवाणीनंतर ॠषी कपूर यांनीही कपूर कुटुंबीय खान कुटुंबाच्या दु:खात सहभागी असल्याचे सांगितले होते. पण भावनेच्या भरामध्ये न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करणे त्यांना पटले नाही. त्यामुळे त्यांनी अभिजीतची कानउघाडणी केली. झाल्या प्रकारानंतर अभिजीतनेही सारवासारव करीत आपला इतरांना दुखविण्याचा काहीही हेतू नव्हता, आजही भारतात कित्येक लोकांवर रस्त्यावर झोपण्याची वेळ येते हा मुद्दा आपल्याला नजरेत आणायचा होता असे सांगितले. तसेच माध्यमांनी आपल्या म्हणण्याचा विपर्यास केल्याचेही त्याने म्हटले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rishi kapoor slams abhijeet over insensitive tweets on salman khan verdict
First published on: 08-05-2015 at 07:38 IST