महापालिकेतील सत्ताधारी भाजप नगरसेवकांनी मनात आणले तर नागपूर एका दिवसात स्वच्छ होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘स्वच्छ भारत अभियान’ फलद्रुप होऊ शकते. मात्र, अस्वच्छतेतच हीत दडले असल्याने सत्ताधाऱ्यांनी सूचक मौन धारण केले असून ऐवजदारांकडून मिळेल ती ‘मलाई’ पदरात पाडून घेत आहेत.
दोन दिवस सफाई कामगार किंवा कचरा वाहून नेणारी  गाडी न आल्यास सफाई कामगारांनाच नागरिकांकडून लक्ष्य केले जात असल्याचा अनुभव सार्वत्रिक आहे. महापालिकेत स्थायी, रोजंदारी, कंत्राटी आणि ऐवजदार असे चार प्रकारचे कामगार काम करतात. त्यापैकी स्थायी, रोजंदारीवरील बहुतेक कामगार हे बांधकाम विभागात आहेत. सुमारे ४ हजार ७०० सफाई कामगार ज्यांना आपण ऐवजदार म्हणतो ते आणि ३ हजार ५०० स्थायी कामगार नागपूर स्वच्छ करण्याचे काम करतात. यापैकी जे ऐवजदार पदवीधर आहेत त्यांच्या हातून झाडू काढून त्यांना शाळा किंवा इतर विभागांमध्ये चतुर्थ श्रेणी कामगारांचे काम देण्यात आले आहे. मात्र, उर्वरित कामगार हे नागपुरातील सर्वच झोनमध्ये सफाईची कामे करतात, अशी माहिती आहे.
ढोबळमानाने सफाई कामगारांना नऊ तास काम करावे लागते. सकाळी ६.३० वाजताची वेळ असली तरी अनेक भागात ऐवजदार उशिरा कामास सुरुवात करतात. सकाळी ७.३० वाजता या कामगारांची हजेरी होते. ८ वाजता कामाला सुरुवात होते.
१२ ते १.३० त्यांच्या दुपारच्या जेवणाची वेळ आणि त्यानंतर दोन ते चार वेगळ्या प्रकारची कामे ज्याला ‘बिगार’ असे म्हणतात, करावी लागतात. असे सफाई कामगारांचे वेळापत्रक आखले गेले आहे. या वेळापत्रकाला फाटा देत नगरसेवकांच्या आशीर्वादाने वेगळी व्यवस्था सफाई कामगारांनी बनवली आहे आणि त्यास सत्ताधारी पक्षाचा अजिबात आक्षेप नसल्याने सफाई कामगारांचे फावते आहे.
कामगारांनी सकाळी सफाईच्या कामाला सुरुवात केल्यानंतर ९.३० ते १०.३० यावेळेत ठरावीक नगरसेवकांच्या हद्दीत काही सफाई कामगार शौचालये सफाई, सोसायटीतील सफाई, अंगण झाडण्यासारखी कामे करून रोजची ३०० ते ४०० रुपयांची कमाई करतात. सफाई कामगार म्हणून त्यांना मिळणारा मेहनताना वेगळा आहे. यातील १५० रुपये जमादारापर्यंत पोहोचवले जातात. हा जमा झालेला पैसा शिपायापासून जमादार, निरीक्षक, आरोग्य अधिकारी आणि नगरसेवकांपर्यंत पोहोचवला जातो. त्यामुळे अतिरिक्त मिळणाऱ्या पैशातून ऐवजदाराला  वाटा मिळतो आणि त्यांच्याकडून नियमित मिळणाऱ्या ‘कमिशन’मुळे साखळीतील मासेही उखळ पांढरे करून घेत आहेत. यासंदर्भात सिटीझन फोरमने तीव्र आक्षेप घेतला आहे.  अशाप्रकारे पैसे हडपणाऱ्यांची साखळी असल्याचे मान्य केले आहे. सफाई कामगारांना मिळणारा पैसा नागरिकांच्या करातून दिला जातो. त्यातच भ्रष्टाचार होत असून सत्तारूढ पक्षाच्या आशीर्वादाशिवाय ते शक्य नसल्याची प्रतिक्रिया संघटनेचे सरचिटणीस सुधाकर तिडके यांनी व्यक्त
केली आहे.

तक्रार आल्यास कारवाई -बोरकर
या संदर्भात भाजपचे नेते व स्थायी समितीचे अध्यक्ष नरेंद्र बोरकर म्हणाले, या प्रकरणी माझ्याकडेही तक्रारी आलेल्या आहेत. महापालिकेने नेमून दिलेल्या वेळेत कोणी काम करीत असेल तर ते गैर आहे. नगरसेवकांपर्यंत ‘कमिशन’ जाते हे मीही ऐकले आहे. मात्र, या संदर्भात कोणीही तक्रार केलेली नाही. तक्रार आल्यास ताबडतोब निलबंन किंवा बडतर्फीची कारवाई केली जाईल.