शहर पोलीस भरती प्रक्रियेत १०० मीटर अंतराच्या ट्रॅकवरून उपस्थित झालेल्या वेगवेगळ्या मुद्दय़ांची दखल घेत पहिल्या दिवशी सहभागी झालेल्या ४१६ उमेदवारांची पुन्हा एकदा धावण्याची चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २१ जून रोजी संबंधितांची ही चाचणी होईल. पहिल्या दिवशी उमेदवारांना हे अंतर पार करावयाला लागलेला कालावधी आणि इतर दिवशी हे अंतर पार करण्यासाठी लागलेला कालावधी यात तफावत आढळून आली. यावरून या ट्रॅकची आखणी करणाऱ्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
नाशिक पोलीस आयुक्तालयामार्फत ४७१ शिपाई पदांसाठी पोलीस कवायत मैदानावर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या जागांसाठी तब्बल १२ हजारहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले. प्रत्येक दिवशी साधारणत: ९०० उमेदवारांची शारीरिक चाचणी घेतली जात आहे. या प्रक्रियेत १०० मीटर धावण्याचा अंतर्भाव आहे. धावण्याच्या ट्रॅकविषयी उमेदवारांकडून काही प्रश्न उपस्थित करण्यात आले. पहिल्या दिवशी आणि इतर दिवशी या ट्रॅकची जितकी लांबी होती, त्यात पाच ते सहा पावलांचा फरक पडला. परिणामी, पहिल्या दिवशी हे अंतर पार करण्यास लागलेला कालावधी आणि इतर दिवशी उमेदवारांना लागलेला कालावधी यात फरक पडला. छाननीअंती त्यात त्रुटी असल्याचे निदर्शनास आले. या पाश्र्वभूमीवर पोलीस आयुक्तालयाने पहिल्या दिवशी ज्या ४१६ उमेदवारांची धावण्याची चाचणी झाली, त्यांना पुन्हा या चाचणीसाठी बोलाविले आहे. या उमेदवारांची १०० मीटर धावण्याची चाचणी पुन्हा २१ जून रोजी घेतली जाणार असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. ट्रॅकविषयी जे आक्षेप घेतले जात आहेत, त्यात कोणतेही तथ्य नसल्याचा दावा संबंधित अधिकाऱ्यांनी केला. या ट्रॅकची आखणी अ‍ॅथलेटिक्स संघटनेच्या देखरेखीखाली करण्यात आली होती. तसेच भरतीच्या संपूर्ण प्रक्रियेचे छायाचित्रण करण्यात आले आहे. या छायाचित्रणाचा अभ्यासातून उपरोक्त त्रुटी निदर्शनास आल्या. त्यानंतर पहिल्या दिवशीच्या उमेदवारांना पुन्हा धावण्याच्या चाचणीसाठी बोलाविण्याचे निश्चित करण्यात आले.