महापालिकेने नागरिकांना कराच्या बदल्यात द्याव्यात अशा एकएक सुविधा कोलमडू लागल्या आहेत. कचरा संकलनाच्या दुरवस्थेनंतर आता सेफ्टी टँक स्वच्छ करण्याच्या सुविधेचा क्रमांक लागला आहे. केडगाव तसेच सावेडीतील नागरिकांना मनपाकडे रोख पैसे जमा केल्यानंतरही या सुविधेसाठी महिन्यापेक्षाही अधिक प्रतिक्षा करावी लागत आहे.
सावेडी तसेच केडगाव येथे मैला वाहून नेण्यासाठी भुयारी गटार योजना नाही. त्या परिसरातील यच्चयावत सर्व बंगले, वसाहतींना यासाठी आपापल्या घराच्या मागे, आवारात सेफ्टी टँक बांधून घ्यावा लागतो. यातील मैला दरमहा स्वच्छ करावा लागतो. त्यासाठी मनपाकडे असे टँक स्वच्छ करणाऱ्या दोन गाडय़ा आहेत. दोन्ही खराब झाल्या आहेत.
आणखी गाडय़ा कशाला घ्यायच्या अशा विचाराने या सेवेचे खासगीकरण करण्याचा ठरावच सर्वसाधारण सभेत मंजूर करून घेण्यात आला आहे. मात्र ते खासगीकरण अद्याप अस्तित्वात आलेले नाही.
मनपाचा भरमसाठ मालमत्ता करा जमा करणाऱ्या नागरिकांना मनपाने ही सुविधा त्याबदल्यात विनामोदला दिली पाहिजे. कारण संकलीत करात याचाही समावेश आहे, मात्र सावेडी, केडगावमधील नागरिकांनी त्यासाठी मनपाकडे पैसे जमा करावे लागतात. एक टँक स्वच्छ करण्याचे मनपा १५० रूपये आकारते. हे पैसे जमा केल्यावर गाडी ८ ते १० दिवसांत येते. त्यानंतर महिनादोन महिन्याने पुन्हा पैसे जमा करून टँक स्वच्छ करून घ्यावा लागतो. उपनगरांची लोकसंख्या कमी होती तोपर्यंत हे काम व्यवस्थित सुरू होते. गेल्या काही वर्षांत या परिसरात वसाहती वाढल्या. नवे घर झाले की घरापेक्षाही सुरूवातीलाच सेफ्टी टँक बांधावा लागतो. घरे वाढली मात्र मनपाने सेफ्टी टँक स्वच्छ करणाऱ्या गाडय़ांच्या संख्येत काही वाढ केलेली नाही. त्यामुळे पैसे जमा केले गाडी लगेच आली असे कधीही होत नाही. एक गाडी दिवसभरात साधारण ३ ते ४ टँक स्वच्छ करते. मनपाच्या दोन गाडय़ांपैकी एक कायम नादुरूस्त असते.
महिनाभरापुर्वी दुसरीही बिघडली. त्यामुळे स्वच्छता विभागाचे सेफ्टी टँक स्वच्छ करण्याचे वेळापत्रकही बिघडले. पैसे जमा करून महिना झाला तरीही गाडी न आल्याने नागरिक मात्र हैराण झाले आहेत. अनेकांनी आता खासगी गाडय़ांना दुप्पट पैसे देत सेफ्टी टँक स्वच्छ करून घेणे सुरू केले आहे.