एशियन कुस्ती (फिला) संघटनेच्या वतीने बिसाक (किरगिजिस्तान) येथे घेण्यात आलेल्या चौथ्या पांरपरिक आशियायी चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेमध्ये हनुमान तालीम कुस्ती संकुलचा मल्ल साईराम रामचंद्र चौगले याने कास्यपदक मिळवले. महाराष्ट्रातून या कुस्ती संकुलाच्या दोन मल्लांची या स्पर्धेसाठी निवड झाली होती. साईराम चौगले व ऋषिकेश पाटील यांची जल्लोषी मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले.
बसाक किरगिजिस्तान येथे जागतिक पारंपरिक कुस्ती संघटनेच्या वतीने या स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेमध्ये १५ देशांच्या मल्लांनी सहभाग घेतला होता. भारतातून या स्पर्धेसाठी ९ मल्लांची निवड झाली होती. यामध्ये राशिवडेच्या हनुमान कुस्ती संकुलाचे साईराम रामचंद्र चौगले यांची ६० किलो वजन गटात व ऋषिकेश राजेंद्र पाटील यांची ६६ किलो वजन गटातून निवड झाली होती. साईराम चौगले याने ६० किलो वजन गटातून कलाकिस्तान, इराण, किरगिजिस्तानच्या मल्लांना हरवून कास्यपदक मिळवले. पारंपरिक कुस्ती संघटनेचे अध्यक्ष एम.ओस्मोनोव्हे. ए. के. सौदी यांच्या हस्ते पदक प्रदान करण्यात आले.  
साईराम व ऋषिकेश यांचे राशिवडे मधे जल्लोषी मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले. यावेळी कुस्ती समालोचक कृष्णात चौगले, मार्गदर्शक सागर चौगले, प्रशिक्षक धनंजय पाटील, कुस्ती संकुलाचे अध्यक्ष समीर गुळवणी, उपाध्यक्ष संभाजी चौगले, मधुकर िशदे, सुहास कुंभार, अजरुन चौगले, विजय तापेकर, अमर चौगले यांच्यासह ग्रामस्थ, संकुलाचे मल्ल उपस्थित होते.