गेल्या आठ वर्षांपासून रखडलेला कुर्ला एल विभागातील ‘एमटीएनएल’ रस्त्याचे काम आता अखेर पूर्ण झाले असून पालिकेने नवीन वर्षांची भेट देत तो वाहतुकीसाठी खुला केला आहे. त्यामुळे आता वाहनधारकांना साकीनाका ते सहार विमानतळापर्यंतचे अंतर अवघ्या तीन मिनिटांत कापता येईल. या रस्त्यामुळे साकीनाका, मरोळ आणि कुर्ला-अंधेरी रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
मुंबई महानगरपालिकेने कुर्ला एल विभागातील लाठीया रबर रस्ता आणि एमटीएनएल या रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम सुरू केले होते. २००५ मध्ये या रस्त्याचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे देण्यात आले होते. पण ‘एमएमआरडीए’ला ते काम शक्य झाले नाही. त्यामुळे रखडलेला हा प्रकल्प महानगरपालिकेने हाती घेतला. या रस्त्यावरील प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांमुळे व प्रकलपग्रस्तांना राजकीय पाठबळ असल्याने काम संथगतीने पुढे जात होते. कुल्र्यातील स्थानिक संघटनांनी महानगरपालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यांनी राजकीय दबाव असतानाही काम वेगाने पुढे नेण्याचे आदेश दिले.
त्यातूनच आता एमटीएनल रस्ता पूर्ण झाला आहे. या रस्त्याची लांबी ४३५ मीटर असून रूंदी १६.३० मीटर आहे. त्यासाठी मिठी नदीवर पूल बांधून पूर्ण करण्यात आला आहे. हा रस्ता झाल्याने अंधेरी-कुर्ला रस्त्यावरून मिठी नदी ओलांडून पुलावरून थेट सहार रस्त्यावर जाणे शक्य झाले आहे. आतापर्यंत त्यासाठी साकीनाका, मरोळ असा वळसा घालावा लागायचा. त्यामुळे वाहनधारकांना २० ते ४० मिनिटे प्रवास करावा लागायचा. आता अवघ्या तीन मिनिटांत हे अंतर कापता येईल. ‘एमटीएनएल’ रस्त्यासाठी सात कोटी ६८ लाख रुपये खर्च झाला आहे.
तर लाठिया रबर रस्त्याचे काम ९४ टक्के पूर्ण झाले आहे. तो रस्ता एप्रिल २०१४ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यासाठी सुमारे १४ कोटी रुपये आतापर्यंत खर्ची पडले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sakinaka sahar distance to shrink from 5 km to 1 km
First published on: 01-01-2014 at 06:10 IST