लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहराच्या विविध भागांत त्यांना अभिवादन करण्यात आले.
अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी डॉ. प्रदीप मरवाळे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी िशदे, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. आनंद गव्हाणे, जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विकास नाईक, उपजिल्हाधिकारी डॉ. श्रीमंत हारकर, जिल्हा पुनर्वसन अधिकारी स्वाती िशदे आदी उपस्थित होते. लातूर महापालिकेत अण्णा भाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना अभिवादन करण्यात आले. महापौर स्मिता खानापुरे, उपमहापौर सुरेश पवार, नगरसेवक, मनपा अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शहरातील आनंदनगर, मोतीनगर, प्रकाशनगर, अंबाजोगाई रोड, आदर्श कॉलनी, एलआयसी कॉलनी, नांदेडनाका भागात अण्णा भाऊ साठे, तसेच टिळक यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अण्णा भाऊ साठे चौकातील अण्णाभाऊंच्या पूर्णाकृती पुतळय़ास पुष्पहार अर्पण करण्यासाठी विविध संस्था, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची दिवसभर रीघ लागली होती. पावसाची रिपरिप सुरू असतानाही कार्यकर्त्यांचा उत्साह कायम होता.
अण्णा भाऊ साठेंना सर्वपक्षीयांचे अभिवादन
प्रतिनिधी, औरंगाबाद
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त विविध पक्ष, संघटनांनी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील चौकात अण्णा भाऊ साठेंच्या प्रतिमेला सर्वपक्षीय नेत्यांनी अभिवादन केले. लोकशाहीरचा बाज आणि अण्णा भाऊंच्या साहित्यावर नेतेमंडळींनी प्रकाश टाकला. आमदार प्रदीप जैस्वाल यांसह रिपब्लिकन चळवळीतील नेते उपस्थित होते.
सकाळी सिडको भागातील सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्यावतीने मोटरसायकल रॅली काढण्यात आली. एन-२ येथील अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पुतळ्यापर्यंत रॅली नेण्यात आली. रिपब्लिकन सेनेच्या वतीने ज्येष्ठ नागरिक मुरलीधर ताकवाले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीनेही शहराध्यक्ष सुमीत खांबेकर, संतोष पाटील आदींनी अभिवादन केले. शहागंज येथील महाराष्ट्र हिंदी विद्यालयातही अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. भारतीय दलित पँथरच्या वतीने लक्ष्मण भूतकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी ‘जग बदल घालूनि घाव, मज सांगूनि गेले भीमराव’ अशी गीते सादर करण्यात आली.
‘बीडमध्ये अण्णा भाऊंचा पूर्णाकृती पुतळा उभारणार’
वार्ताहर, बीड
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने परवानगी दिल्यास शहरात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येईल. तसेच नगरपालिकेतही वाचनालय सुरू केले जाईल, अशी ग्वाही माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी दिली.
शहरातील साठे चौकात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन सभेत ते बोलत होते. नगराध्यक्षा दीपा क्षीरसागर, माजी आमदार उषा दराडे, युवा रिपाइंचे प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे, अलका तोकले, अशोक वाघमारे आदी उपस्थित होते. हा पूर्णाकृती पुतळा उभारण्यास पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी पुढाकार घेतला आहे. परवानगी मिळाल्यास नगरपालिकेच्या वतीने पूर्णाकृती पुतळा व वाचनालय उभारण्यात येईल, अशी ग्वाही डॉ. क्षीरसागर यांनी दिली. या वेळी समाजबांधव मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
अण्णा भाऊंना परभणीत अभिवादन
वार्ताहर, परभणी
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पुतळा चौक जयंती समितीच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
समितीतर्फे आयोजित कार्यक्रमास अध्यक्षस्थानी महापौर प्रताप देशमुख, तसेच आयुक्त सुधीर शंभरकर, डॉ. सुरेश सदावत्रे, भीमराव हत्तीअंबीरे, पोलीस निरीक्षक रामकृष्ण चाटे आदी उपस्थित होते. हेमंत साळवे फाऊंडेशनतर्फे शहरातून दुचाकीफेरी काढण्यात आली. खानापूर फाटा येथून अशोक उबाळे व किशोर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली लाल सेना ऑटो संघटना व लहुजी मित्रमंडळ यांच्या वतीने संयुक्तपणे अण्णा भाऊंच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी एस. पी. सिंह यांनी अण्णा भाऊंच्या प्रतिमेस अभिवादन केले. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी एन. पी. मित्रगोत्री, अतिरिक्त जिल्हाधिकारी संभाजी झावरे आदी उपस्थित होते.  
विविध संघटनांतर्फे जयंती साजरी
संबोधी अकादमीच्या वतीने संबोधी कार्यालयात साठे जयंती साजरी झाली. संबोधीचे अध्यक्ष भीमराव हत्तीअंबीरे, दि. फ. लोंढे, भराडे आदींनी अभिवादन केले. राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष नरहरी सोनवणे, सचिव गजानन मुडे, युवा अध्यक्ष प्रकाश गोरे, सतीश वाघमारे, संदीप आस्वार उपस्थित होते. ओबीसी सेवा मंडळ कार्यालयात साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. संस्थापक अध्यक्ष नारायण खंदारे, काशीनाथ साखरे आदी उपस्थित होते. उघडा महादेव मंदिर परिसरात विश्वकर्मा महाविद्यालयात साठे जयंती, तसेच लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष मनोहर चौधरी होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salutation of anna bhaou sathe lokmanya tilak in latur
First published on: 02-08-2013 at 01:56 IST