पाण्यासाठी उर्जेची आणि उर्जेसाठी पाण्याची नितांत आवश्यकता असून दोन्ही गोष्टी अतिशय मर्यादित असल्याने ऊर्जा व पाणी बचत करण्याचे आवाहन इन्स्टिटय़ूशन ऑफ इंजिनिअर्सच्या स्थानिक केंद्रात आयोजित कार्यक्रमाव्दारे मान्यवरांनी केले.
महापालिका आयुक्त संजय खंदारे, आर. के. पवार, जी. बी. शेडजी, विजय कोठारी, संजय लोंढे, ओमप्रकाश कुलकर्णी, इन्स्टिटय़ूशन ऑफ इंजिनिअर्सच्या स्थानिक केंद्राच्या मानद सचिव अपूर्वा जाखडी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात पाणी व ऊर्जा बचत यांच्याकडे लक्ष वेधण्यात आले. पाणी व ऊर्जा हे दोन घटक परस्परांवर अवलंबून आहेत. उर्जेचे अनेक प्रकार असून पाण्यासाठी सर्व प्रकारच्या उर्जेचा मोठय़ा प्रमाणात वापर करण्यात येतो. कोळसा, इंधन, गॅस विविध खनिजे आदी ऊर्जा निर्मितीच्या स्त्रोतांकरिता मोठय़ा प्रमाणावर पाण्याचा वापर होतो. सध्याच्या वापरापेक्षा २० टक्के जादा पाण्याचा वापर भविष्यात होणार आहे. पारंपरिक ऊर्जा निर्मितीकरिता पाण्याच्या स्त्रोतांची उपलब्धता करावी लागते. विशेषत: औष्णिक व आण्विक वीज प्रकल्पांकरिता तापमान नियंत्रण करणे तसेच जलविद्युत निर्मिती करण्याकरिता प्रामुख्याने पाण्याची मुबलक उपलब्धता हा महत्वाचा घटक असून अनेक वीज प्रकल्पांना पाण्याअभावी वीज निर्मिती करणे थांबविण्याची वेळ आली आहे.
अपारंपरिक ऊर्जा निर्मितीसाठी (उदा. सौरऊर्जा, पवनऊर्जा) देखील कमी-अधिक प्रमाणात पाण्याचा वापर करावाच लागतो.  एकूण वीजनिर्मितीच्या आठ टक्के विजेचा वापर हा पाणी उपसा व प्रक्रिया करून ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी होत असल्याचे यावेळी मांडण्यात आले.
उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन खूप महत्वाचे असून तितकेच आव्हानात्मक आहे. संपूर्ण पृथ्वीतलावर पाणी हे अतिशय असमान व अनियमित आहे. त्यातच वाढत्या लोकसंख्येमुळे वाढणारी पाण्याची मागणी, वाढते शहरीकरण, प्रदुषण, वातावरणातील बदल, बदलते जीवनमान या आणि इतर कारणांमुळे पाण्याचे उपलब्ध स्त्रोत कमी होत असून मोठय़ा प्रमाणात प्रदूषित होत आहेत. त्यामुळे पाण्यासाठी दिवसेंदिवस तीव्र स्पर्धा होणार आहे. पाण्याचे सुयोग्य व समान नियोजन सर्व वापरकर्त्यां घटकांच्या सहकार्याशिवाय व एकत्रित कामाशिवाय होऊ शकत नाही.
नाशिकमध्ये महापालिकेमार्फत दिवसांतून रोज दोन वेळा पाणी पुरवटा केला जातो.
शहराच्या पाणी पुरवठय़ासाठी महानगरपालिका पाटबंधारे खात्याकडून शहराजवळील गंगापूर धरण व दारणा धरणातून पाणी घेते. शुद्ध केलेले पाणी शहरवासियांपर्यंत पुरवठा करण्यासाठी महानगरपालिकेस मोठा खर्च येतो. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरणे गरजेचे आहे. एकदा वापरून झालेले पाणी पुन्हा पिण्यायोग्य न राहता सांडपाण्यात रूपांतरीत होऊन नदीत मिसळले जाते. त्यामुळे जलप्रदुषणाची समस्या उद्भवून ते शुद्ध करण्यासाठी मोठा खर्च येतो, हे यावेळी नमूद करण्यात आले. या खर्चात सर्वाधिक वाटा हा विजेवरील खर्चाचा आहे. जलाशयातून पाणी उपसा करून प्रक्रिया करून नागरिकांपर्यंत पोहोचविण्यापर्यंत सुमारे ४७० लक्ष युनिट किंवा पाणी वापरानंतर तयार होणारे मलजल जमा करून, प्रक्रिया करून पुनर्वापरासाठी देण्याकरिता सुमारे ७१ लक्ष युनिट वीज दरवर्षी खर्ची पडत आहे. त्यामुळे प्रत्येकाने पाण्याचा काटकसरीने वापर केल्यास विजेचीही बचत होईल.
पाण्यसााठी जंगलांचाही मोठय़ा प्रमाणात ऱ्हास होत आहे. पाणी उपलब्ध करण्यासाठी मोठमोठी धरणे, जलाशये बांधण्याकरिता हजारो हेक्टर वनक्षेत्राचा बळी दिला जात आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन केल्यास वनसंवर्धनास मदत होणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आल्याची माहिती इन्स्टिटय़ूशन ऑफ इंजिनिअर्सच्या स्थानिक केंद्राच्या मानद सचिव अपूर्वा जाखडी यांनी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saving of water energy is interrelated
First published on: 27-03-2014 at 11:34 IST