वीज नाही, पाणी नाही, कोळीष्टकांनी भरलेले स्वयंपाकघर, फाटलेले तंबू, तुटलेले चौथरे, बिनदरवाजांची शौचालये, महिलांसाठी स्वच्छतागृहेच नाहीत, कुत्र्यांचा हिंस्र वावर, दरवाजे- खिडक्यांची तावदाने तुटलेल्या खोल्यांमध्ये पक्षांचे साम्राज्य, सुरक्षा रक्षक बेपत्ता आणि गर्दुल्ल्यांचा अड्डा बनलेल्या पवई येथील स्काऊट गाईड शिबीर स्थळाची पालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून या सात एकर भूखंडाच्या विकासासाठी आगामी वर्षांच्या अर्थसंकल्पात १.०२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासंदर्भातील वृत्त ‘लोकसत्ता’ने दिले होते.
आरे कॉलनीजवळील पवई चेक नाक्याजवळील फिल्टर पाडय़ात सात एकरांवर स्काऊट गाईड प्रशिक्षण केंद्र आहे. ४० वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या केंद्राकडे पालिकेने लक्षच दिलेले नाही. विद्यार्थ्यांसाठी तेथे उभारलेल्या तंबूत वीजच नाहीत.
शौचालयांना दरवाजेच नाही. महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नाही. पिण्याचे पाणी नाही, भोजनगृहात मिट्ट काळोख आणि जोडीला अस्वच्छता आणि दरुगधी यांचे साम्राज्य आहे. पेवरब्लॉक उखडले असून संरक्षक भिंत असून नसल्यासारखीच आहे. सुरक्षा रक्षक नसल्याने येथे गर्दुल्ले आणि गुंडांचाच वावर आहे. त्यातच या भूखंडाकडे बिल्डरांची वक्रदृष्टी झाली असून हा भूखंड गिळंकृत करण्यासाठी बिल्डर नेते मंडळींना हाताशी धरू लागले होते.
याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता – मुंबई वृत्तान्त’मध्ये १५ जानेवारी रोजी प्रसिद्ध होताच प्रशासनाने तात्काळ प्रशिक्षण केंद्राची पाहणी करवून घेतली. या भूखंडावर रॉक क्लायबिंग, व्हॅली क्रॉसिंग, वॉल क्लायबिंग, रोप क्लायबिंग, सस्पेन्शन ब्रीज वॉक, मंकी ब्रीज या सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे लॅन्ड स्कॅपिंग आर्किटेक्चरकडून सर्वसमावेशक असा आराखडा तयार करून या भूखंडाचा टप्प्याटप्प्याने विकास करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी २२०१४-१५ च्या अर्थसंकल्पात १.०२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Scout guide training center development
First published on: 07-02-2014 at 12:59 IST