प्राचीन काळात शिल्पकला ही जनसंपर्काचे नि:शब्द माध्यम होती. निरक्षरांशी भाषेविना संवाद साधण्याचे ते एक प्रमुख साधन होते. अकराव्या शतकात अंबरनाथ येथे उभारण्यात आलेले शिवमंदिर हे त्याचे ठळक उदाहरण आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध लेखिका डॉ. कुसुद कानिटकर यांनी धनत्रयोदशीच्या संध्याकाळी येथील थोरले बाजीराव पेशवे सभागृहात त्यांच्या ‘अंबरनाथचे शिवालय’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात केले. पुरातत्त्व विभागाचे माजी संचालक डॉ. अरविंद जामखेडकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
पुस्तक प्रकाशनाआधी डॉ. कुसुद कानिटकर यांनी स्लाइडस्द्वारे प्राचीन शिल्पांची भाषा उलगडून दाखवली. धर्माची ओळख ही शिल्पांद्वारे करून दिली जात होती. त्या काळात काही समाज घटकांना मंदिर प्रवेश निषिद्ध होता. त्यामुळे मंदिराच्या बाहेरील बाजूस मोठय़ा प्रमाणात शिल्पशिळा कोरण्यात आल्या. समाज निरक्षर असला तरी किमान तो सुसंस्कृत असावा, अक्षरओळख नसली तरी दृश्य माध्यमातून त्याला ज्ञान द्यावे, हा हेतू शिल्प कोरण्यामागे होता. अंबरनाथच्या मंदिरांवरील शिल्पेतसुद्धा लोकशिक्षणाचा उत्कृष्ट नमुना आहेत. या पुस्तकाच्या निमित्ताने या मंदिरांवरील शिल्पांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न मी केला आहे, असे त्यांनी सांगितले.  
अंबरनाथचे शिवमंदिर हे भूमीज शैलीतील सर्वात जुने मंदिर असून मंदिरांच्या स्थापत्याविषयी लिहिताना सर्व पुरातत्त्व संशोधकांना या मंदिरापासूनच सुरुवात करावी लागते. शिल्पकलेच्या माध्यमातून प्राचीन काळातील निरक्षर बहुजन समाजास रामायण, महाभारत ही महाकाव्ये तसेच तत्त्वज्ञान समजले. शिल्पांची ही भाषा समजून घेण्याच्या दृष्टीने हे पुस्तक निश्चितच उपयुक्त आहे, असा अभिप्राय पुरातत्त्व विभागाचे माजी संचालक डॉ. अरविंद जामखेडकर यांनी व्यक्त केला.   डॉ. कुमुद कानिटकर रसायनशास्त्राच्या प्राध्यापिका. अंबरनाथच्या शिवमंदिरावरील शिल्पवैभव पाहून त्या प्रभावित झाल्या. सलग १३ वर्षे अभ्यास करून त्यांनी याविषयावर दीड वर्षांपूर्वी इंग्रजी ग्रंथ लिहिला. त्याला फ्रान्समधील संस्थेचा प्रतिष्ठेचा हिरायामा पुरस्कार मिळाला. आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरवलेल्या या ग्रंथाचे मराठी रूपांतर मंगळवारी दिवाळीच्या पूर्वसंध्येस प्रसिद्ध झाले. दिलीप कानिटकर यांनी हा ग्रंथ प्रकाशित केला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पॉप्युलर प्रकाशन संस्थेच्या मृदुला जोशी यांनी केले. लेखिका संजीवनी खेर, डॉ. अरुणचंद्र पाठक, ग्रंथमित्र श्याम जोशी, सदाशिव टेटविलकर, भालचंद्र कुलकर्णी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sculpture salient medium of public relations say dr kumud kanitkar
First published on: 24-10-2014 at 12:50 IST