अंधेरी येथे अंध विक्रेत्याकडूनच नव्हे तर रेल्वे परिसरातील विक्रेत्यांकडून हप्ता वसूल करणाऱ्या अण्णा भगत या रेल्वे सुरक्षा दलाच्या उपनिरीक्षकास वरिष्ठ अधिकाऱ्यांची साथ असल्याचे सीबीआयच्या चौकशीत आढळून आले आहे. भगत वरिष्ठांना देण्यासाठी हप्ते गोळा करत होता, असे त्यानेच या चौकशीत सांगितले आहे. भगतला ‘कलेक्टर’ या नावाने अंधेरी परिसरात ओळखले जाते. विशेष म्हणजे या संदर्भात विक्रेत्यांनी यापूर्वी अनेक वेळा रेल्वेच्याच दक्षता विभागाकडे (व्हिजिलन्स) यासंदर्भात तक्रारी केल्या होत्या. त्यातही धक्कादायक बाब म्हणजे पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक महेशकुमार हेच या विभागाचे प्रमुख आहेत. तरीही ‘कलेक्टर’चे ‘कलेक्शन’ राजरोस सुरू होते. त्यामुळे हा दक्षता विभाग नेमके काय करतो, असा प्रश्न निर्माण झाला आङे.
अंधेरी पश्चिमेस रेल्वेस्थानक परिसरातील विक्रेत्यांकडून दररोज किमान ५०० रुपयांचा हप्ता भगत वसूल करत असे. त्याला शनिवारी पकडण्यात आल्यावर रेल्वे सुरक्षा दलाच्या अनेक अधिकाऱ्यांच्या हप्तावसुलीच्या सुरस कहाण्या बाहेर आल्या. भगतच्या घरी तसेच कार्यालयामध्ये काही लाखांची रोख रक्कम मिळाल्याचे सीबीआयच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. चर्चगेट रेल्वे स्थानकामध्ये असलेल्या रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक यश मिश्रा यांच्या कार्यालयावरही सीबीआयने अलीकडेच छापे टाकले होते. तेथेही मोठय़ा प्रमाणात रोख रक्कम मिळाली होती. मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनल तसेच बोरिवली येथे बाहेरगावच्या गाडय़ांमधून उतरणाऱ्या प्रवाशांकडून केवळ सामान तपासणीच्या नावाखाली हजारो रुपये वसूल केले जातात.  याबाबत वारंवार पश्चिम रेल्वेच्या दक्षता विभागाकडे (याचे प्रमुख पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक महेशकुमार आहेत) तक्रारी करण्यात आल्या. मात्र त्या तक्रारींना आजवर केराची टोपली दाखविण्यात आली आहे.
रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांकडेच अशी बेहिशेबी रक्कम सापडलेली नाही, तर रेल्वे अधिकाऱ्यांकडेही अशी रक्कम सीबीआयच्या छाप्यात सापडली असल्याचे सूत्रांनी सांगितले. सीबीआयने विभागीय रेल्वे व्यवस्थापकांच्या अहमदाबाद येथील घरी छापा मारला असता ८० लाख रुपये, एक किलो सोने तसेच गुजरातमध्ये मद्यबंदी असूनही दारुच्या ३० बाटल्या सापडल्या होत्या. दक्षता विभागाकडे रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांच्या या हप्तावसुलीबाबत तक्रारी केल्यानंतर त्यांनी कोणतीही हालचाल केलेली नाही.  याबाबत दक्षता विभागाकडे नोव्हेंबर महिन्यात तक्रार करण्यात आल्याचे अंधेरीच्या विक्रेत्यांनी सांगितले. विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार, केवळ अंधेरीच नव्हे तर चर्चगेट ते विरार या उपनगरी मार्गावर रेल्वे सुरक्षा दलाचे काही अधिकारी हप्तावसुलीचे काम करत असतात. या विक्रेत्यांनी सीबीआयकडे तक्रार केल्यानंतर तात्काळ कारवाई झाल्यामुळे पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांच्या नेतृत्वाखालील दक्षता पथक नेमके कोणते काम करते हा प्रश्न निर्माण झाला आहे.