आगामी २०१३-१४ वर्षांच्या रेल्वे अर्थसंकल्पासाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून सात नवीन रेल्वेगाडय़ा सुरू करण्याचा प्रस्ताव तयार करून रेल्वे मुख्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. यात सोलापूर-नागपूर, सोलापूर-हैदराबाद, सोलापूर-कोल्हापूर, लातूर-तिरूपती, सोलापूर-जयपूर व्हाया साईनगर शिर्डी साप्ताहिक तसेच सोलापूर-गोवा व नांदेड-कोल्हापूर अशा एक्स्प्रेस गाडय़ांचा प्रस्ताव समाविष्ट आहे.
याशिवाय आठवडय़ातून तीन दिवस धावणारी मुंबई-पंढरपूर फास्ट पॅसेंजर दररोज सुरू करणे, मुंबई-विजापूर फास्ट पॅसेंजरही आठवडय़ातून चार दिवसांऐवजी दररोज सुरू करणे व सोलापूर-यशवंतपूर आठवडय़ातून तीन दिवसांऐवजी दररोज सुरू करण्याचा प्रस्तावही तयार करून मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. याबाबतची माहिती मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाचे वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक सुशील गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. यावेळी सहायक वाणिज्य व्यवस्थापक बी. एल कोरी उपस्थित होते.
सोलापूर व परिसरातील प्रवाशांची गर्दी वाढत असल्याने त्याचा विचार करून रेल्वे प्रशासनाने नवीन मेल, एक्स्प्रेस व पॅसेंजर गाडय़ांसह सध्याच्या रेल्वेगाडय़ांच्या फेऱ्यांमध्ये वाढ करणे, गाडय़ांचा विस्तार करणे, कोचेस वाढविणे आदी प्रस्ताव रेल्वे मुख्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत. मुख्यालयात सर्व बाबींचा निकषांच्या आधारे तपासणी होऊन जे प्रस्ताव सुयोग्य व सयुक्तिक आहेत, ते पुढे रेल्वे मंत्रालयाकडे सादर केले जातील व अंतिम निर्णय रेल्वे मंत्रालय घेणार असल्याचे गायकवाड यांनी नमूद केले. अंतिम निर्णय घेताना येत्या फेब्रुवारी-२०१३ मध्ये रेल्वेच्या अर्थसंकल्पात योग्य प्रस्तावांची घोषणा होऊ शकते, अशी आशा गायकवाड यांनी व्यक्त केली. सध्या धावणाऱ्या काही गाडय़ांच्या पल्ल्यांमध्ये विस्तार करण्याचा प्रस्ताव तयार करून पाठविण्यात आला आहे. यात पटणा-पूर्णा एक्स्प्रेस गाडीला लातूपर्यंत वाढ करणे, हैदराबाद-बीदर गाडीला लातूपर्यंत वाढ करणे, बागलकोट-यशवंतपूर एक्स्प्रेसला पंढरपूपर्यंत वाढ करणे व अन्य तीन गाडय़ांना व्हाया वाडी-सोलापूर व पुणेमार्गे करणे असे प्रस्ताव समाविष्ट आहेत. तर सोलापूर-पुणे-सोलापूर हुतात्मा इंटरसिटी एक्स्प्रेसला दोन कोचेस, सोलापूर-मुंबई-सोलापूर सिध्देश्वर एक्स्प्रेसला दोन कोचेस, मुंबई-साईनगर शिडी फास्ट पॅसेंजरला एक थ्री टायर वातानुकूलित कोच, मुंबई-लातूर एक्स्प्रेसला तीन कोचेस व एक वातानुकूलित कोच वाढविण्याचा प्रस्ताव तयार करून पाठविण्यात आला आहे. याशिवाय सात पॅसेंजर गाडय़ांसाठी प्रत्येकी दोन कोचेस वाढविणे, पुणे-नांदेड गाडीला दोन सामान्य कोच तर सोलापूर-पुणे इंटरसिटी गाडीला दोन द्वितीय श्रेणीचे बैठक कोच वाढविणे तसेच परळी-मिरज पॅसेंजरला दोन सामान्य कोचेस व सोलापूर-पुणे हुतात्मा एक्स्प्रेसला एका वातानुकूलित श्रेणी बैठक कोच वाढविण्याचा प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याचे गायकवाड यांनी सांगितले.