चेंबूरच्या आरसीएफ वसाहतीमध्ये राहणाऱ्या एका ४० वर्षीय महिलेने तिच्या मुलाच्या अल्पवयीन मित्राचे लैंगिक शोषण करून ते मोबाइलमध्ये चित्रित करून त्याला ब्लॅकमेल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आरसीएफ पोलीस ठाण्यात या महिलेविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. विशेष म्हणजे या मुलाने आत्महत्या करण्यासाठी म्हणून लिहिलेली चिठ्ठी त्या मुलाच्या आईच्या हाती पडली आणि त्यातून हा प्रकार समोर आला.
चेंबूरच्या आरसीएफ वसाहत परिसरात राहणाऱ्या या पीडित मुलाचा दहावीत शिकणारा मित्र जवळच राहतो. हा मुलगा आपल्या मित्राकडे जात असे. चार महिन्यांपूर्वी हा मुलगा आपल्या मित्राला भेटण्यासाठी गेला असता संबंधित महिलेने आपला मुलगा घरात नसल्याचे सांगून या पीडित मुलाला बोलावले. त्यानंतर तिने त्याला शीतपेय दिले. हे शीतपेय प्यायल्यानंतर त्या मुलाला गुंगी आली. तो शुद्धीवर आल्यानंतर त्याला त्याच्या मित्राच्या आईने त्याच्यासह शारीरिक संबंध ठेवल्याचे समजले. हा प्रकार या महिलेने मोबाइलमध्ये चित्रित केल्याचेही त्या मुलाला दाखवले, असा आरोप पीडित मुलाने केला आहे.
या चित्रीकरणाच्या जोरावर त्या महिलेने पीडित मुलाला वारंवार असे संबंध ठेवण्याची जबरदस्ती केली. हे संबंध न ठेवल्यास त्याला आणि त्याच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकीही तिने दिल्याचे या मुलाने तक्रारीत म्हटले आहे. अखेर या प्रकाराला कंटाळून या मुलाने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.
त्याआधी लिहिलेल्या चिठ्ठीत त्याने आपल्या मित्राच्या आईने केलेला सगळा प्रकार नमूद करत आपल्या आत्महत्येसाठी तिला जबाबदार धरावे, असे लिहिले. सुदैवाने ही चिठी पीडित मुलाच्या आईच्या हाती पडली. तिने सगळा प्रकार आपल्या पतीच्या कानावर घातला. त्यानंतर दोघांनी या मुलाला धीर देत पोलीस ठाण्यात धाव घेतली.
पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत बुधवारी या महिलेविरोधात अत्याचार, धमकी देणे, ब्लॅकमेल करणे, बालअत्याचार प्रतिबंधक कायदा या अंतर्गत गुन्हा दाखल केल्याचे आरसीएफ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राऊत यांनी सांगितले. मुलाच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला असून अद्याप अशी कोणतीही चित्रफीत सापडलेली नाही. तसेच मुलाला गुंगीचे औषध दिल्याचेही प्राथमिक तपासात पुढे येत आहे, असे राऊत यांनी सांगितले. तसेच संबंधित महिलेला अद्याप अटक केलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sexual exploitation of a minor child from the woman
First published on: 03-04-2015 at 12:38 IST