निसर्गचक्र पूर्णपणे बदलल्याचा अनुभव मागील वर्षांपासून शेतकऱ्यांना येत असून या अस्मानी संकटाला तोंड देण्यासाठी पर्यायांचा विचार करण्याशिवाय शेतकऱ्यांसमोर गत्यंतर नाही. जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे वार्षिक अर्थचक्र द्राक्ष आणि कांदा या दोन पिकांवर अवलंबून असून गारपीट झाल्यास या दोन्ही पिकांचे होणारे नुकसान मोठे असते. अलीकडेच जिल्ह्यात झालेल्या गारपिटीत ज्या द्राक्षबागांना आच्छादन केलेले होते, त्यांचे नुकसान कमी प्रमाणात झाल्याचे निदर्शनास आले आहे.
या महिन्यात झालेला अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम अद्याप सुरू असल्याने नुकसानीचा नेमका आकडा उपलब्ध होण्यास अवधी लागणार आहे. याआधीची गारपीट निफाड तालुक्यातील रूई आणि दिंडोरी तालुक्यातील खेडगाव, सोनजांब तसेच चांदवड तालुक्यातील वडनेरभैरव परिसरात झाली होती. त्यावेळी नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ सोनजांब, वडनेरभैरव गाठले होते. नुकसानग्रस्त द्राक्ष बागाईतदारांना धीर देताना मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी नुकसान भरपाई करण्यासाठी मदत देण्याचे आश्वासन दिले असता द्राक्ष बागाईतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना आर्थिक मदतीऐवजी शेतीला आच्छादित करण्यासाठी आयात करण्यात येणारे प्लास्टिक स्वस्त स्वरूपात द्राक्ष बागायतदारांना कसे देता येईल, याकडे लक्ष देण्याची सूचना केली होती. विदेशात नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी बागांवर प्लास्टिकचे आच्छादन टाकण्यात येते. या प्लास्टिक आच्छादनामुळे गारांचा माराही वरच्यावर झेलला जावून बागांचे संरक्षण होते. हे प्लास्टिक काही बडय़ा शेतकऱ्यांनी आयातही केले आहे. परंतु त्याची किंमत सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडणारी नाही. या प्लास्टिकचा खर्च एकरी एक लाखापेक्षा अधिक आहे. त्यामुळे हे प्लास्टिक आयात करण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा विचार करावा, अशी सूचना द्राक्ष बागाईतदार संघाने केली होती. मुख्यमंत्र्यांनी या सुचनेचे स्वागत करून त्याचा नक्कीच विचार करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. परंतु त्यानंतर या विषयावर कोणतीच कार्यवाही झाली नसल्याचे दिसून येते.
मागील नुकसानीची कोणतीही भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नसताना या महिन्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नाशिक जिल्ह्यास झोडपून काढले. यावेळी नुकसानीचा विस्तार सिन्नर तालुक्यापर्यंत झाला. गारपिटीमुळे द्राक्षबागा उद्ध्वस्त झाल्या. नुकसानीचा आकडा कित्येक कोटींच्या घरात गेला असताना ज्यांनी शेतीसाठी शेडनेटचा वापर केला होता त्यांचे नुकसान कमी प्रमाणात झाल्याचे आढळून आले. नेटच्या कापडामुळे गारा वरच्यावर झेलल्या गेल्या.
गारांचे प्रमाण अधिक असल्याने काही ठिकाणी नेटचे कापड फाटण्याचे प्रकार घडले. तर, काही ठिकाणी नेटची पूर्णपणे झोळी झाली. परंतु काही प्रमाणात इतरांपेक्षा त्यांचे नुकसान कमी झाले. याचा विचार करून राज्य शासनाने द्राक्ष बागाईतदार संघाच्या सुचनेकडे गांभिर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.