राज्यात एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस, शिवसेना हे पक्ष नवी मुंबईत राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात असून युतीचे ४३ व काँग्रेसचे १० अशा ५३ नगरसेवकांची जुळवाजुळव केल्यानंतर अपक्षांच्या साह्य़ाने पालिकेत सत्ता स्थापण्याची संधी काँग्रेस व युतीला उपलब्ध झाली आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सेनेचे उमेदवार विजय नाहटा यांना उघड मदत केली होती. ती दोस्ती लक्षात घेऊन सेना हे गणित जुळवण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसच्या हातात सत्तेच्या चाव्या चालून आलेल्या आहेत.
नवी मुंबई पालिकेत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत प्राप्त झालेले नाही. राष्ट्रवादीच्या ५३ जागा आणि त्यांनी पुरस्कृत केलेल्या दोन अशा ५५ जागांचे गणित जुळून येत आहे, पण एका नगरसेवकासाठी राष्ट्रवादीला अपक्षांची मनधरणी करावी लागणार आहे. यातील चार अपक्ष कोणाला कौल देतात, याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहेत.
चार अपक्षांनी सेना-भाजप युतीकडे जाण्याची निर्णय घेतल्यास राष्ट्रवादीची मोठी पंचाईत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्र आणि राज्यात असलेली सत्ता पाहता युती हे प्रयत्न करणार आहे. त्यामुळे अपक्षांना हाताशी धरून काँग्रेसच्या पाठिंब्यावर पालिकेत सत्ता आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. युतीने हा प्रयोग केल्यास काँग्रेसच्या नगरसेवकांना महत्त्व येणार असून उपमहापौरपदाच्या बदल्यात राष्ट्रवादीबरोबर समझोता केला जाईल, असे जाणकारांचे मत आहे. नवी मुंबईतील काँग्रेसच्या नगरसेवकांनी कधीही काँग्रेस पक्षश्रेष्ठींचे आदेश पाळल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे काँग्रेसच्या नगरसेवकांची भूमिकाही महत्त्वपूर्ण ठरणार आहे.  

प्रतिक्रिया
विकासाच्या मुद्दय़ावर काँग्रेसने मित्रपक्षाला साथ द्यावी
मुख्यमंत्र्यांनी केलेले खोटे आरोप, सत्तेचा गैरवापर यामुळे आमच्या सात जागा कमी झाल्या आहेत. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात गोबेल्स पद्धतीचा वापर केला गेला. त्याचा फटका राष्ट्रवादीला काही प्रमाणात बसला आहे. आम्हाला ६० जागांची अपेक्षा होती, मात्र आम्ही बहुमताच्या जवळपास गेलो असून अपक्षांच्या साह्य़ाने सत्ता स्थापन करणार आहोत. दोन अपक्षांशी आत्ताच संपर्क साधला असून आमची मॅजिक फिगर पूर्ण झाली आहे. असे असले तरी आमचा मित्रपक्ष काँग्रेसने विकासाच्या मुद्दय़ावर एकत्र यावे, अशी माझी अपेक्षा आहे. त्यांचे आम्ही स्वागत करू.
-गणेश नाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते

ही तर सुरुवात आहे
मी माझ्या पक्षाच्या जोरावर एकटी लढल्यानंतर आमदार होऊ शकले, पण युती झाल्यानंतर आमचा फायदा झाला नाही, याला कोण जबाबदार आहे, हे प्रसारमाध्यमांनी शोधून काढावे. जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य असून यात पंतप्रधान मोदी यांची लोकप्रियता कमी झाल्याचा प्रश्न येत नाही. ही स्थानिक निवडणूक असून या ठिकाणी पैसा, बाटली, मनी अ‍ॅण्ड मसल पॉवरने काम केले आहे. ही तर माझी सुरुवात आहे. एकाचे सहा झाले, पुढे यात आणखी वाढ होईल याचा विश्वास आहे. मला पक्ष वाढविण्यासाठी केवळ चार महिने मिळाले हे या ठिकाणी महत्त्वाचे आहे. इतरांनी ४० वर्षे पक्ष रुजवले आहेत.
-मंदा म्हात्रे, आमदार (भाजप), बेलापूर

सत्ता गेल्याचे दु:ख
पालिकेत आमचे १७ नगरसेवक होते. त्यात दुपटीपेक्षा जास्त भर पडली आहे. पक्षाच्या दृष्टीने ही समाधानाची बाब असून सत्तेच्या जवळ जाऊन सत्ता काबीज करता येत नाही याचे दु:ख आहे. काँग्रेसबरोबर युती करण्याचा निर्णय हा सर्वस्वी पक्षप्रमुखांचा आहे. आम्ही त्याविषयी काही बोलणार नाही, मात्र कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीमुळे हे यश मिळाले, अशी आमची भावना आहे.
-मनोहर गायखे, उपजिल्हाप्रमुख, शिवसेना</strong>

राष्ट्रवादीबरोबर जाण्याची तयारी
पक्षाचे सहा नगरसेवक ऐन निवडणुकीच्या वेळी सोडून गेले, त्यामुळे उमेदवार उभे करताना अडचण आली. अन्यथा काँग्रेसने १५ चा आकडा गाठला असता, मात्र भाजपपेक्षा आमच्या जास्त जागा आलेल्या आहेत, हे इथे नोंद करण्यासारखे आहे. भाजपची हवा कमी होऊ लागल्याचे हे द्योतक असून पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार, पक्षश्रेष्ठींनी ठरविल्यास राष्ट्रवादीची साथ देण्याची आमची तयारी आहे.
-रमाकांत म्हात्रे, काँग्रेस स्थानिक नेते