माजी उपपंतप्रधान तथा कराडचे दिवंगत सुपुत्र यशवंतराव चव्हाण यांचा २८ वा स्मृतिदिन उद्या रविवारी (दि. २५) विविध उपक्रम व कार्यक्रमांनी होत आहे. अगदी सकाळी कृष्णा – कोयना प्रीतिसंगमावरील समाधीस्थळावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह त्यांचे सहकारी मंत्रिगण व लोक आदरांजली वाहणार आहेत.
महाराष्ट्राच्या या लाडक्या नेत्याला स्मृतिदिनानिमित्त श्रध्दांजली वाहण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील आज सायंकाळीच कराड येथे दाखल झाले आहेत. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारही श्रध्दांजली वाहण्यासाठी येण्याचे निश्चित होते,मात्र प्रशासनाकडे रात्री उशिरापर्यंत त्यांचा दौरा उपलब्ध झालेला नाही. दरम्यान, उद्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री रामराजे निंबाळकर, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकास व अर्थमंत्री जयंत पाटील, वनमंत्री पतंगराव कदम, पशुसंवर्धनमंत्री मधुकरराव चव्हाण, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, प्रकाश सोळंकी आदी कराड दौऱ्यावर येणार असून, यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी होणाऱ्या श्रद्धांजली कार्यक्रमाला हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दीनिमित्त उद्या चव्हाणसाहेबांच्या २८ व्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दरवर्षीप्रमाणे आयोजित यशवंत कृषी प्रदर्शन यंदा भव्य स्वरूपात भरविण्यात आले आहे. तर, कराड पालिकेतर्फे नगरपालिकांच्या प्रतिनिधींचे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. ‘हे राष्ट्र देवतांचे’ हे चित्रप्रदर्शनही भरविण्यात आले आहे. वेणुताई सभागृह ते यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळ अशी पदयात्रा काढण्यात येणार आहे. सायंकाळी साडेसहा वाजता नगर वाचनालयातर्फे ‘यशवंतरावांचे संरक्षण क्षेत्रातील योगदान’ या महत्त्वपूर्ण विषयावर पुण्याचे विनायक श्रीधर अभ्यंकर यांचे व्याख्यान होणार आहे. तसेच ५१ व्या ‘अंकुर’ साहित्य संमेलनाचा समारोप डॉ. पतंगराव कदम यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. याचबरोबर शहर परिसरासह तालुक्यात दरवर्षीप्रमाणे यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त  विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.