सोरायसिस हा त्वचारोग संसर्गजन्य किंवा आनुवंशिक नसून या रुग्णांनी घाबरावयाचे मुळीच कारण नाही. आयुर्वेद औषधी सोरायसिसकरिता लाभकारक असल्याचे सोरायसिसविरोधी अभियान चालविणारे ज्येष्ठ आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. अनिल उपगडे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. महाराष्ट्रात ‘सोरायसिस’ या त्वचारोगाचे रुग्ण वाढत असल्याच्या पाश्र्वभूमीवर डॉ. उपगडे बोलत होते.
सोरायसिसची वैशिष्टय़े, लक्षणे : सोरायसिस हा फक्त त्वचेशी संबंधित आजार आहे. त्वचेवर पांढऱ्या रंगाचे चट्टे येणे, खाज सुटणे, त्वचेचा भुसा पडणे ही प्रमुख लक्षणे असलेल्या त्वचा विकार सोरायसिस म्हणून ओळखला जातो. ‘सोरायसिस’ हा आजार प्रामुख्याने त्वचा निर्मितीशी संबंधित आजार आहे. याचा जंतूशी काडीचाही संबंध नाही. सोरायसिस हा जंतुसंसर्गामुळे नसल्याने हा आजार दुसऱ्या व्यक्तीला केवळ स्पर्शाने प्रसारित होत नाही. हा १०० टक्के संसर्गजन्य नाहीच. आमच्याकडे सोरायसिस संबंधित येणारे रुग्ण एखादी जखम होऊन याची सुरुवात झाल्याचे सांगतात. त्याकडे प्रथम दुर्लक्ष केले जाते. काही दिवसांनंतर हा सर्वागावर पसरतो अशीच साधारण सुरुवात होते. सोरायसिसचे चट्टे फार विद्रुप आणि एखादी कोंबडी सोलल्यासारखे देखील दिसतात. पांढऱ्या चांदीच्या किंवा माशाच्या खवल्यासारखी चमकदार त्वचा दिसणे, खाज येणे आणि मृत त्वचा कोंडय़ासारखी निघून जाणे, हे प्रामुख्याने सोरायसिसची लक्षणे आहेत, अशी माहिती डॉ. उपगडे यांनी दिली.  
सोरायसिस बरा होतो का, या प्रश्नाचं उत्तर सोप नाही. सोरायसिस नक्की का होतो याचं कारण अजून विज्ञानाला कळलेलं नाही. त्यामुळे त्याचं चोख औषध अजून तयार झालेलं नाही. आयुर्वेदिक औषधे शरीरातील दोषांना दूर करतात त्यामुळे आयुर्वेदिक औषधाने रुग्णांना बऱ्यापकी मुक्तता मिळते. तो सुसह्य़ होतो.
सोरायसिसच्या रुग्णांना खाज येणं हे लक्षण वेड लावणारे असते. यावर जायफळ उगाळून लावल्यास खाज मिटते. गूळ, हळद समप्रमाणात गोळी करून दोन वेळा घेणे सुद्धा हिताचे आहे. कोरफडीचा रस, खसखस वाटून लावल्याने खूप आराम मिळतो. योग, प्राणायामसोबत तणाव कमी करणारी जीवनशैली, अध्यात्मात रस घेणे याचा सुद्धा चांगला फायदा होतो. सोरायसिसच्या रुग्णांना तपासणी केल्यानंतर काही आयुर्वेदिक औषधे सुचविली जातात. चोपचिनी केपी टॅबलेट, शस्तादि गुगुळ, कुंर्कुमा (हळदीची कॅप्सूल) मधुपर्णी तेल पोटात घेणे याचा सल्ला दिला जातो. त्वचेवर बाहेरून लावण्यासाठी झिनसोरा मलम, महावज्रक तेल उपयोगी असल्याचे डॉ. उपगडे यांनी सांगितले. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Solid tretement of ayurveda on psoriasis patient
First published on: 08-03-2013 at 04:08 IST