ध्वनिप्रदूषणाबाबत कडक नियम लागू होऊनही पालिकेकडून त्याची अंमलबजावणी होत नसल्याने शहरातील हरवलेली शांतता पुन्हा परतण्याची अंधुकशी शक्यता आहे. न्यायालयाच्या दणक्यानंतर पालिकेने शहरातील ध्वनीची पातळी मोजून ती कमी करण्यासाठी उपाय सुचवणारी सल्लागार समिती नेमण्यास मंजुरी दिली आहे. मात्र पालिकेच्या ‘काम चालू आहे’ या पद्धतीने या योजनेची अंमलबजावणी झाल्यास मात्र पुढील दशकभर कानठळ्या बसणे निश्चित असेल.
वाहनांची गर्दी, फटाके, बेंजो, मंदिर-मशिदीतील प्रार्थना, कारखाने यामुळे शहरातील लोकसंख्येमुळे होत असलेल्या गोंगाटात अधिकच भर पडते. आवाजामुळे तात्पुरते बहिरेपण, अस्वस्थता, तणाव अशी लक्षणे दिसतात. दीर्घकाळ गोंधळात राहण्याची वेळ आली तर श्रवणशक्तीवर कायमचा परिणाम होऊ शकतो. याशिवाय सतत डोकेदुखी, उच्च रक्तदाब, हृदयाचे असंबद्ध ठोके, मानसिक अनारोग्य असे दुष्परिणामही आवाजामुळे होतात. शहरातील सातत्याने वाढणाऱ्या आवाजाबाबत सामाजिक संघटनांनी पुढाकार घेतल्यानंतर केंद्र सरकारने ध्वनिनियम जाहीर केले. त्यानुसार शाळा-महाविद्यालय, न्यायालय, रुग्णालय, मदान यांच्या शंभर मीटपर्यंतच्या परिसरात शांतता क्षेत्र जाहीर करण्यात आले असले, तरी या ठिकाणी आवाजाची पातळी किती आहे याचा सातत्याने अभ्यास झालेलाच नाही. शहराच्या ध्वनीची पातळी मोजून नॉइज मॅिपग करणेही आवश्यक होते. मात्र पालिकेने त्याकडे आतापर्यंत हेतुपुरस्सर दुर्लक्षच केले होते. सामाजिक संस्था तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून गणेशोत्सवाच्या काळात तसेच दिवाळीच्या आधी होत असलेली ध्वनिपातळीची नोंदणी एवढेच काय ती आतापर्यंतची नोंदणी. प्रदूषण नियंत्रण मंडळाने वांद्रे, वडाळा, पवई, कांदिवली, गोवंडी, फोर्ट व बोरिवली या सात ठिकाणी ध्वनिमापन यंत्रे बसवली आहेत. मात्र अवाढव्य मुंबईच्या मानाने केवळ सात ठिकाणच्या माहितीचा फारसा उपयोगच होत नाही. उच्च न्यायालयाच्या सततच्या धोशामुळे अखेरीस महानगरपालिकेने यासंदर्भात सल्लागार समिती नेमण्याचे ठरवले आहे. स्थायी समितीच्या बठकीत प्रशासनाच्या या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. यासाठी पालिकेला ७७ लाख रुपये खर्च येणार आहे. शाळा, महाविद्यालय, मंदिर, मशिद, वाहतूक चौक, बाजार, रुग्णालय, न्यायालय, मदाने अशा तब्बल १२०० ठिकाणी ध्वनीची नियमित नोंद केली जाईल. आवाजाची पातळी वाढवणारे घटक लक्षात घेतले जातील. त्यामुळे आवाजाची पातळी कमी करण्यासाठी मदत होईल, अशी माहिती महानगरपालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
बारसे, लग्न, पूजा, प्रार्थना, मिरवणुका अशा आवाज वाढवणाऱ्या घटकांचा सर्वात जास्त त्रास वृद्ध व बालकांना होतो. त्यातच रात्रीच्या वेळेस सुरू झालेल्या आवाजामुळे अनेकांची झोपमोड होत असे. मात्र ध्वनिनियमांमुळे रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेतील आवाज बऱ्याच अंशी कमी झाला आहे. गेले दशकभर सुरू असलेल्या प्रयत्नांना पालिकेच्या पावलांमुळे दिशा मिळाली आहे. मात्र हा निर्णय तातडीने अमलात आणला गेला पाहिजे, असे आवाज फाऊंडेशनच्या सुमायरा अब्दुलाली यांनी सांगितले. ध्वनिपातळीची माहिती मिळाली, की मग पातळीचे कसे व किती नियोजन करायला हवे ते लक्षात येईल, असे त्या म्हणाल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sound will be measured in 1200 place of mumbai
First published on: 30-01-2015 at 12:05 IST