पीएमपीतील ज्या चालकांनी आतापर्यंत छोटे-मोठे अपघात केलेले आहेत, अशा चालकांना दोन ते सात दिवसांचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम पीएमपीतर्फे हाती घेतला जात असून, अशा चालकांच्या वाईट सवयी दूर करण्याबरोबरच त्यांच्या हातून गाडी चालवताना घडलेल्या चुका पुन्हा होऊ नयेत, याबाबत त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
पीएमपीचे कामगार व जनता संपर्क अधिकारी दीपकसिंग परदेशी यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. पीएमपीच्या अनेक चालकांकडून आतापर्यंत छोटे-मोठे अपघात झाले आहेत. त्याबद्दल त्यांच्यावर कारवाईदेखील झाली असून काही सेवकांवरील कारवाई प्रलंबित आहे. अशा सर्वच चालकांकडून भविष्यात पुन्हा अपघात घडू नयेत, तसेच त्यांच्या हातून ज्या चुकीमुळे अपघात घडले त्या चुका त्यांच्या हातून पुन्हा घडू नयेत, यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्याची योजना असल्याचे परदेशी यांनी सांगितले.
गाडी चालविण्यातील धोकादायक सवयी, तसेच पुन:पुन्हा घडणाऱ्या गंभीर चुका याबाबत ज्या चालकांचे अहवाल प्राप्त झाले आहेत, त्यांच्या विरुद्ध खातेनिहाय चौकशी केली जाऊन त्यांना तीन दिवसांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. ज्या चालकांच्या हातून गंभीर अपघात घडले आहेत त्यांना शासन होते. त्यानंतर ते कामावर पुन्हा रुजू होण्यापूर्वी त्यांना सात दिवसांचे प्रशिक्षण देऊन मगच रुजू करून घेण्याचाही निर्णय झाला आहे. पीएमपीचे अपघात विभागातील अधिकारी तसेच वाहतूक पोलीस, प्रवासी यांच्याकडून आलेल्या तक्रारी किंवा नियम न पाळण्याबाबत झालेली कारवाई अशा चालकांना तातडीने तीन दिवसांचे प्रशिक्षण दिले जाईल.
बदली/कंत्राटी चालकांनाही प्रशिक्षण देण्याचे नियोजन असून, न्यायालयीन आदेशानंतर पुन्हा रुजू होणाऱ्या चालकांनाही तीन आठवडय़ांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. ज्या चालकांकडून गाडय़ा सातत्याने ब्रेकडाऊन म्हणून परत आणल्या जातात, अशा चालकांनाही गाडी चांगल्या पद्धतीने चालविण्याचे दोन दिवसांचे प्रशिक्षण दिले जाईल. ठेकेदाराच्या सर्व चालकांना तसेच भाडेतत्त्वावर घेतलेल्या गाडय़ांच्या सर्व चालकांनाही प्रशिक्षण देण्याची योजना आहे.
पीएमपीच्या उपक्रमाची वैशिष्टय़े
* सर्व चालकांसाठी योग, स्वास्थ्य शिबिरे
* दर तीन महिन्यांनी सर्वाना प्रशिक्षण
* संगणकीय सादरीकरणाद्वारेही प्रशिक्षण
* उपक्रमात स्वयंसेवी संस्थांचीही मदत घेणार