सांगली महापालिकेतील स्वीकृत आणि स्थायी सदस्य निवडीवरून काँग्रेस अंतर्गत निर्माण झालेला संघर्ष पेल्यातील वादळ ठरले आहे. तीन स्वीकृत सदस्यांसह १६ स्थायी सदस्यांचा ठराव महापौर कांचन कांबळे यांच्या स्वाक्षरीने कायम झाला असून स्थायी सभापती निवडीसाठी १७ ऑक्टोबर रोजी बठक बोलाविण्यात आली आहे.
सांगली महापालिकेच्या स्थायी सदस्यांची निवड करताना राष्ट्रवादी काँग्रेसने ५ नावे स्वाभिमानी विकास आघाडीने २ नावे आणि काँग्रेसने ९ नावे दिली होती. तर स्वीकृत सदस्यपदासाठी राष्ट्रवादी, स्वाभिमानी आघाडी यांना प्रत्येकी १ आणि काँग्रेसला ३ जागा वाटय़ाला आल्या होत्या. ही नावे निवडताना सदस्यांना विश्वासात घेतले नसल्याच्या कारणावरून काँग्रेस अंतर्गत वाद निर्माण झाला होता. खुद्द महापौर, उपमहापौरांनी या संदर्भात फेरनिवडीची मागणी केली होती. पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनीही राजीनामे देण्याचे आदेश दिले होते. मात्र काँग्रेस नेते मदन पाटील यांनी कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात म्हणून राजीनामे घेण्याचे टाळले. त्यामुळे या प्रकरणावर पडदा पडला आहे.
स्थायी समितीच्या १६ सदस्यांमध्ये काँग्रेसचे ९ सदस्य असून सभापतिपदासाठी संजय मेंढे व राजेश नाईक यांच्यामध्ये चुरस आहे. काँग्रेसमध्ये होणाऱ्या धुसफुशीचा लाभ मिळतो का, याकडे विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्ष आहे.