राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागाच्या अनेकविध योजना आहेत, त्यांचा लाभ घेण्यासाठी संस्थांनी मोठय़ा संख्येने पुढे आले पाहिजे, मात्र संस्था येत नाहीत असा अनुभव आहे, नगरच्या संस्थांनी तो खोटा ठरवावा व आपले प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सांस्कृतिक कार्य विभागाकडे सादर करावेत असे आवाहन या विभागाचे संचालक आशुतोष घोरपडे यांनी केले.
राज्य बाल नाटय़ स्पर्धेच्या अंतिम फेरीचे उद्घाटन बाल रंगभूमीवर गेली अनेक वर्षे कार्यरत असलेले नगरचे रंगकर्मी डॉ. विजय जोशी यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात आज सकाळी झाले. यावेळी घोरपडे तसेच नाटय़ परिषदेच्या नगर शाखेचे अध्यक्ष सतीश शिंगटे, कार्यवाह सतीश लोटके, ज्येष्ठ रंगकर्मी पी. डी. कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते.
घोरपडे यांनी नगरला स्पर्धात्मक रंगभूमी आहे याचा आवर्जून व कौतुकाने उल्लेख केला. मात्र स्पर्धेत नाटके सादर करून न थांबता नाटय़चळवळ पुढे नेण्याचा प्रयत्न करावा असे ते म्हणाले. डॉ. जोशी यांनी बाल रंगभूमीचे महत्व विषद केले. मोठय़ा व्यावसायिक रंगभुमीला अनेक नामवंत कलाकार दिले आहेत. संस्कारीत कलावंत हवे असतील तर ते बालरंगभुमीतूनच मिळतील असे जोशी म्हणाले.
बालरंगभूमीसाठी योगदान देत असलेल्या रंगकर्मी (तुषार चोरडिया), सप्तरंग (शाम शिंदे), कलायात्रिक (सुलभा कुलकर्णी), हाऊसफुल्ल (अच्यूत देशमुख) यांचा कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. पी. डी. कुलकर्णी यांनी प्रास्तविक केले. अमोल खोले यांनी सूत्रसंचालन केले. समन्वयक रितेष साळुंके यांनी आभार मानले.