नगरपालिकांचे पदाधिकारी व सदस्यांनी आपण शहराचे विश्वस्त असल्याच्या भूमिकेतून ठरवलेले धोरण व नियमांचे काटेकोरपणे पालन करताना कोणत्याही नागरिकाबाबत दुजाभाव होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. पालिकेच्या उत्पन्नाचे  मार्ग निर्माण करून आस्थापना खर्चावर नियंत्रण ठेवताना एकूणच आर्थिक शिस्त आणण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. वाढते शहरीकरण आणि नागरी समस्यांवर सहकार्याचे कर्तव्य बजावले पाहिजे असे आवाहन राज्याचे नगरविकास राज्यमंत्री भास्करराव जाधव यांनी केले.
दिवंगत लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कराड पालिकेतर्फे आयोजित नगरपालिका प्रतिनिधींच्या दोन दिवसीय अधिवेशनाचे उद्घाटन भास्करराव जाधव यांच्या हस्ते दिमाखात पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार बाळासाहेब पाटील हे होते, तर नगराध्यक्षा प्रा. उमा हिंगमिरे, उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था नियामक मंडळाचे सदस्य पापाभाई मोदी यांच्यासह विविध नगरपालिकांचे नगराध्यक्ष, नगरसेवक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. दरम्यान, विविध नगरपालिकांनी आपले विविध मागण्यांचे २० ठराव अधिवेशनाच्या प्रारंभीच मांडले. इस्लामपूरच्या नगराध्यक्षा अरुणादेवी पाटील यांनी इस्लामपूर शहरातील कचरा उचलण्यासाठी घंटागाडी खरेदीचा प्रस्ताव प्रदीर्घ काळ प्रलंबित असल्याचे प्रभावीपणे निदर्शनास आणून दिले असता, ही बाब गांभीर्याने घेऊन लवकरच त्यावर निर्णय घेऊू असे आश्वासन भास्करराव जाधव यांनी जाहीरपणे दिले.
भास्करराव जाधव पुढे म्हणाले की, पुरोगामी महाराष्ट्राला प्रगतिपथावर नेण्याचा पाया यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्व व कर्तृत्वातून रचला गेला. त्यांच्या विचारांशी बांधिल राहून आपण गेल्या तीन वर्षांत अनेक नागरी समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. आज अधिवेशनाच्या प्रारंभीच २० निवेदनाद्वारे समोर आलेल्या अनेक नागरी समस्या गांभीर्याने सोडविण्याचा आपला प्रयत्न राहील अशी ग्वाही त्यांनी दिली. १९६१ पासून झालेल्या जनगणनेच्या आधारे त्यांनी मुंबईसह एकूणच महाराष्ट्रातील वाढती लोकसंख्या व नागरीकरणाची आकडेवारी विषद केली. १९६१ साली २८.६२ टक्के असलेली शहरी लोकसंख्या आता सुमारे ४९ टक्के झाल्याचे सांगताना, त्यामुळे काही शहरात लोकांना नरकयातना भोगाव्या लागत असून, तेथे गलिच्छ वस्त्यांचा उच्छाद झाला असल्याची खंत करून, आता तरी यावर आपण सर्वजण गंभीरपणे विचार करणार की नाही हा या अधिवेशनातील कळीचा प्रश्न असल्याची भूमिका त्यांनी मांडली. बहुतांश नगरपालिकांचा खर्च हा उत्पन्नापेक्षा जास्त असल्याने या शहरांचा विकास कसा होणार असा सवाल त्यांनी केला. कर वसुली नाही, खर्चावर नियंत्रण नाही त्यामुळे पालिकांच्या होणाऱ्या बकाल अवस्थेला तेथील प्रशासनच जबाबदार असल्याची टीका करून शासनाने बऱ्याच बाबींची जबाबदारी घेतली आहे. तरी उत्पन्नाचे मार्ग शोधा, खर्च कमी करा, आर्थिक शिस्त आणा, पारदर्शक कारभारातून पालिकेचा संसार नीटनेटका करा, विश्वस्ताची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडताना विरोधाभास ठेवू नका, आपले शहर स्वच्छ, सुंदर व सर्वसोईंनी परिपूर्ण ठेवा असे कळकळीचे आवाहन भास्करराव जाधव यांनी केले.
पालिकांच्या न्याय्य मागण्यांची दखल घेतली जाईल. पालिकांवरील महसूल खात्याचा अंकुश हटवण्यासंदर्भात विचार केला जाईल. पालिकेच्या कामासाठी मुंबई येथे येणाऱ्या नगराध्यक्षांसाठी विश्रामधाम उभारण्याचा प्रस्ताव सादर केला जाईल. पालिकांच्या प्रशासकीय प्रस्तावावर एक महिन्यात निर्णय घेण्याबाबत कायदा केला जाईल. ज्येष्ठतेनुसार मुख्य लिपिकास मुख्याधिकारी म्हणून पदोन्नती देण्याचा विचार केला जाईल. पालिका पदाधिकारी व सदस्यांच्या मानधनात वाढ केली जाईल. उत्तम कामगिरी करणाऱ्या पालिकांना गुणवत्तेनुसार प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पुरस्कार दिले जातील अशी आश्वासने भास्करराव जाधव यांनी दिली. बाळासाहेब पाटील म्हणाले की, वाढत्या नागरिकरणाची समस्या दिवसेंदिवस गडद होत आहे.
शहरी भागातील लोकांच्या अपेक्षा मोठय़ा राहात असल्याने तोकडे अनुदान आणि समस्या मोठय़ा यामुळे पालिकांची अडचण होऊ लागली आहे. या अधिवेशनाच्या माध्यमातून शहरी समस्यांचा अहवाल शासनापुढे जाणार आहे. पापाभाई मोदी यांनी राज्यातील अनेक नागरी समस्या व पालिकांच्या अडीअडचणींचा सविस्तर आढावा घेताना काही सूचना मांडल्या.
रहिमतपूरचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक सुनील माने यांनी कराडच्या नगराध्यक्षपदाची धुरा तब्बल ४२ वष्रे यशस्वीपणे सांभाळणारे दिवंगत लोकनेते पी.डी. पाटील यांच्या कार्यकर्तृत्वाला उजाळा देताना पी. डी. पाटील यांच्या नावाने आदर्श  नगसेवक पुरस्कार देण्यात यावा, पालिकांचे भक्कम संघटन व्हावे असे आवाहन केले. स्वागत प्रा. उमा हिंगमिरे यांनी तर,  प्रास्ताविक राजेंद्र यादव यांनी केले.