मुंबईचे नेहरू विज्ञान केंद्र आणि नाशिकचे शालेय शिक्षण उपसंचालक कार्यालय यांच्या वतीने उत्तर महाराष्ट्रासाठी आयोजित  
विज्ञान नाटय़ोत्सवात नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या सिन्नर येथील शेठ ब. ना. सारडा विद्यालयाची ‘आरोग्यम् धनसंपदा’ ही नाटिका सर्वोत्कृष्ठ ठरली. नागपूर येथे राज्य विज्ञान संस्थेच्या वतीने आयोजित राज्य स्पर्धेसाठी तिची निवड झाली.
वैज्ञानिक व कलाकारांची समाजाला गरज आहे. त्यांच्या माध्यमातून समाज प्रबोधन प्रभावीपणे होऊ शकते. या हेतूने या विज्ञान वित्रान नाटय़ोत्सवाचे आयोजन करण्यात येते. नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्य़ांसाठीची स्पर्धा नुकतीच नाशिकरोड येथील र. ज. चौहाण गर्ल्स हायस्कूल येथे झाली. शासनाने विविध योजना सुरू करूनही गावात अस्वच्छता असेल व त्यामुळे ग्रामस्थ निरोगी राहत नसतील तर उपयोग काय? विज्ञान आणि समाजाचा समन्वय घडून येणे गरजेचे आहे. गावाने आता बदलायला हवे, असा संदेश देत नास्तिक समाजात झालेला बदल व गावाने स्वच्छतेची धरलेली कास यावर आरोग्यम् धनसंपदा या नाटिकेत प्रकाश टाकण्यात आला आहे. शिक्षण विभागाचे विज्ञान पर्यवेक्षक ए. एम. बागूल, शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे विज्ञान सल्लागार आर. पी. पाटील तसेच अखिल भारतीय नाटय़ परिषदेचे सदस्य प्रा. रवींद्र कदम आदींच्या हस्ते पारितोषिक देवून गौरविण्यात आले. रवींद्र कदम यांनी मनोगतात नेपथ्यकाराचे कौतुक केले. प्रतिक कोकीळ, अनिकेत माळी, विजय खिल्हारी, नीलेश तांबडे, निखील साठे, विश्वेष पंडित, ऋषिकेश आरोटे, चेतन इंगळे, भूषण मोरे यांनी विविध भूमिका साकारल्या. लेखन माधवी पंडित, दिग्दर्शन बापू गोविंद तर नेपथ्याची योजना कलाशिक्षक राहुल मुळे यांनी केली होती.