० भूगोलाच्या पाठय़पुस्तकात भारतातून अरुणाचल प्रदेश गायब
० इतिहासात अंदमान-निकोबारचे नामोनिशाण नाही
० ऐतिहासिक घटनांचे तपशीलही चुकविले
० छपाईपेक्षा स्टीकर लावण्यात वेळ जाणार
दहावीच्या इतिहास-भूगोलाच्या पाठय़पुस्तकांमधील भारताच्या नकाशातील अरूणाचल प्रदेश चीनला ‘भूदान’ करताना किंवा अंदमान-निकोबार बेटे अरबी समुद्रात ‘बुडविताना’ पडले नसतील एवढे कष्ट आता पाठय़पुस्तक मंडळाला ‘स्टीकर’ लावून या चुका दुरुस्त करताना पडणार आहेत.
भूगोलाच्या पुस्तकातील भारताच्या नकाशात अरूणाचल प्रदेश गायब करण्यात आला आहे. तर इतिहासाच्या पुस्तकातील नकाशात अंदमान-निकोबार या बेटांचाचे नामोनिशाणच नाही. या विषयांच्या इंग्रजी पुस्तकात अनेक ऐतिहासिक घटनांचे तपशील चुकविले आहेत. प्रसारमाध्यमातून या चुकांवर बरीच ओरड झाल्यानंतर आता या चुका दुरुस्त करण्याची मोहीम ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा’ने हाती घेतली आहे. त्यानुसार नकाशातील चुकांसाठी सुधारित नकाशाचे स्टीकर लावून तर मजकुरातील चुकांसाठी पुस्तकाच्या शेवटी शुद्धिपत्रक छापून दूर केल्या जाणार आहेत. पण, हे काम अधिक किचकट आणि कटकटीचे असल्याने पुस्तकांच्या छपाईसाठी जितका लागला नाही तितका वेळ स्टीकर लावण्यात जाणार          आहे.
मंडळाने छापलेल्या एकूण पुस्तकांपैकी चार ते साडेचार लाख पुस्तकांची आधीच विक्री झाली आहे. प्रसारमाध्यमांतून ओरड झाल्यानंतर मंडळाने इतिहास-भूगोलाच्या पुस्तकांची विक्री थांबविली. बाजारात गेलेली पुस्तकेही परत मागविली. मंडळाकडे सध्या इंग्रजी आणि मराठी माध्यमाची मिळून सुमारे ११ लाख पुस्तके आहेत. या ११ लाख पाठय़पुस्तकांना स्टीकर लावण्याचे काम मंडळाला बालभारतीच्या मदतीने करावे लागणार आहे. पुस्तकांचे हे गठ्ठे सोडवून, त्यातून पुस्तके काढून, नकाशाचे पान शोधून व्यवस्थित स्टीकर लावण्याचे काम मंडळाला करावे लागणार आहे. पुस्तक छपाईचे काम यंत्राद्वारे होते. पण, स्टीकर चिकटविण्याचे काम कर्मचाऱ्यांकडूनच करून घ्यावे लागणार आहे.  आधीच रिक्त जागा न भरल्याने बालभारतीकडे कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. त्यात लाखो पुस्तकांवर स्टीकर चिटकविण्यासाठी इतके कर्मचारी आणायचे कुठून, असा प्रश्न मंडळासमोर आहे.
कर्मचाऱ्यांची कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती करून हे काम पूर्ण करून घेतले जाईल, असा खुलासा महाराष्ट्र राज्य पाठय़पुस्तक निर्मिती मंडळाचे नियंत्रक विवेक गोसावी यांनी केला. स्टीकर लावण्याचे काम कटकटीचे आहे हे खरे आहे. त्यामुळे जसजशी स्टीकर्स लावून होतील तसतशी पुस्तके बाजारात आणली जातील, अशी माहिती त्यांनी दिली.