केंद्र शासनाच्या चुकीच्या औषधी धोरणामुळे विक्रेत्यांना व्यवसाय करणे कठीण झाले आहे. तसेच  औषध विक्रेत्यांना तोटा सहन करावा लागत असल्याच्या निषेधार्थ येत्या १० मे रोजी औषध विक्रेता संघटनेने देशव्यापी संप पुकारला आहे. एकीकडे व्यापाऱ्यांच्या बंदमुळे सामान्य ग्राहक आधीच त्रस्त झाला असताना आता औषध विक्रेत्यांच्या एक दिवसीय बंदमुळे रुग्णसुद्धा भरडले जाण्याची लक्षणे चिन्हे आहेत. एलबीटीच्या विरोधात सुरू असलेल्या व्यापारांच्या आंदोलनाला औषध विक्रेता संघटनांनी पाठिंबा दिला असला तरी त्यांची औषधांची दुकाने सुरू होती. ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीत बंदचा निर्णय घेण्यात आला. केंद्र शासनाच्या अव्यावारिक धोरणाचा समाचार घेण्यासाठी दिल्लीमध्ये जंतरमंतरवर १० मे रोजी देशभरातील औषध विक्रेते संघटित होणार आहे. त्यात औषधी कायदा २००८ व औषध विक्रेत्यांच्या समस्या यावर विचारमंथन होणार आहे. बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन नागपूर झोनचे अध्यक्ष मुकुंद दुबे यांनी केले.