वेल्डिंगचं काम करून रोजंदारीवर पोट भरणाऱ्या कऱ्हाड येथील गणेश यांच्या घरी लहानग्याचा जन्म झाला तेव्हा प्रतिकूल परिस्थितीत हा आशेचा ‘किरण’ उगवल्याने सारेच आनंदले होते. मात्र महिनाभराच्या किरणला न्युमोनिया झाला आणि उपचारांचाही उपयोग होईना तेव्हा त्याला मुंबईला न्यायला डॉक्टरांनी सांगितले. मुंबईत शीव रुग्णालयात दाखल असताना त्याला पुन्हा न्युमोनिया झाला आणि त्याचा हृदयविकारही उघडकीस आला. या धक्क्याने पार कोलमडून गेलेल्या त्याच्या आप्तांना शीव रुग्णालयातील डॉक्टरांच्या रूपात भेटलेल्या देवदूतांनी धीर दिला आणि अवघ्या चार महिन्यांच्या किरणवर शस्त्रक्रिया करण्याचा नाजूक निर्णय यशस्वीपणे अमलातही आणून दाखविला.
मुंबई महापालिकेच्या शीव रुग्णालयातील हृदयचिकित्सा विभागात अशा एकापेक्षा एक जटील आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया नियमितपणे होत असतात. साधारणपणे वर्षांकाठी लहान मुलांच्या हृदयावरील शंभराहून अधिक शस्त्रक्रिया केल्या जातात. या विभागातील डॉ. अजय महाजन यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांच्या पथकाने किरणच्या हृदयाच्या मुख्य धमनीची अरुंद झडप उघडण्याची ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. त्यानंतर आता संपूर्णपणे बऱ्या झालेल्या चार महिन्याच्या बाळाला डॉक्टरांच्या पायावर घालून सारे कऱ्हाडला आपल्या गावी रवाना झाले.
तपासणीत किरणला ‘आर्टिक स्टेनोसिस’ म्हणजे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या मुख्य धमनीची झडप चिंचोळी होण्याचा आजार जन्मजात जडल्याचे दिसून आले.
यात हृदयाची रक्ताभिसरणाची कार्यक्षमता कायमस्वरुपी निकामी होण्याची शक्यता असल्यामुळे छातीची चिरफाड करून लवकर शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. तथापि बाळाचे वय आणि वजन लक्षात घेता अशी शस्त्रक्रिया केल्यास जिवाला धोका होण्याची शक्यता होती. त्यामुळे डॉ. अजय महाजन, डॉ. हेतल शहा व डॉ. अनुप ताकसांडे यांनी बिनटाक्याची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. बाळाला वारंवार फुप्फुसाचा संसर्ग दोष होता त्यातच त्याचे वजनही वाढत नव्हते. दुर्बिण शस्त्रक्रियेद्वारे हृदयाच्या मुख्य धमनीची झडप उघडून बलून टाकून रक्तपुरवठय़ाचा मार्ग मोकळा केला गेला.
आता किरणची प्रकृती उत्तम असून मंगळवारी डॉक्टरांना कृतज्ञतापूर्वक नमस्कार करून सारेजण कऱ्हाडला रवाना झाले. गरीबांना कोणी वाली नसतो, असे म्हटले जाते परंतु आम्हाला शीव रुग्णालयात डॉक्टरांच्या रुपाने देवच भेटला, असे किरणचे वडिल गणेश यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

साधारणपणे लहान मुलांमध्ये हृदयाला छिद्र असणे, हृदयाच्या बारीक झडपा असे वेगवेगळे आजार आढळून येतात. चार महिन्यांच्या किरणला तीनवेळा न्युमोनिया झाल्याने त्याच्यावरील उपचार हे आव्हान होते. आम्ही ते पेलू शकलो याचा आम्हाला आनंद आहे.
डॉ. अजय महाजन

एक पैही खर्च नाही!
राजीव गांधी जीवनदायी योजनेतून ही शस्त्रक्रिया करण्यात आल्यामुळे त्यांना एक पैसाही शस्त्रक्रियेसाठी खर्च करावा लागला नाही, असे विभागाचे प्रमुख डॉ. प्रताप नाथानी यांनी सांगितले. साधारणपणे वर्षांकाठी शीव रुग्णालयाच्या हृदयचिकित्सा विभागात २८५० शस्त्रक्रिया होतात. यात राजीव गांधी योजनेअंतर्गत गेल्या वर्षभरात ७५१ शस्त्रक्रिया करण्यात आल्या तर वर्षांकाठी बाह्य़रुग्ण विभागात तीस हजार हृदयविकाराने आजारी असलेल्यांवर उपचार केले जातात, असे डॉ. महाजन यांनी सांगितले.

मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Successful heart surgery on four month baby
First published on: 10-09-2014 at 06:54 IST