सुमारे ३५० वर्षांपूर्वीपासूनची परंपरा असलेल्या जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ घटमांडणीच्या अंदाजानुसार यंदा पर्जन्यमान व पाऊस समाधानकारक राहणार असून शेतकऱ्यांचे महत्त्वाचे रोखीचे पीक कापूस मात्र अनिश्चित राहणार आहे. ज्वारी व अन्य पिके भरपूर प्रमाणात होतील. पुढच्या अक्षय्य तृतीयेपर्यंत राजकारणात ताण कायम राहणार असून विद्यमान युपीएचीच सत्ता कायम राहील. देशाची आर्थिक स्थिती उत्तम राहील. आज सकाळी सूर्योदयापूर्वी भेंडवळ मांडणीचे प्रणेते सारंगधर महाराज वाघ व पुंजाजी महाराज वाघ यांनी हजारोंच्या उपस्थितीत हा अंदाज जाहीर केला. रामदास महाराज यांची प्रकृती बरी नसल्याने सारंगधर महाराज व पुंजाजी महाराज यांच्यावर घटमांडणीचे निष्कर्ष जाहीर करण्याची जबाबदारी टाकण्यात आली.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ही घटमांडणी मांडण्यात आली. आज भल्या पहाटे सूर्योदयापूर्वी तिचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले. त्यानुसार येत्या हंगामात ज्वारी, तीळ, तूर, बाजरी, मुंग आदि खरीप पिके अतिशय चांगली राहतील, तर शेतकऱ्यांचे मुख्य रोखीचे पीक कापूस अनिश्चित राहील. या पिकांसोबत उडीद, भादली, तांदूळ, जवस, लाख, वटाणा, गहू, हरभरा ही पिके बेभरवशाची राहणार आहेत. घटमांडणीत यावर्षी पृथ्वीचे प्रतीक असलेली पुरी कायम राहिल्याने भूकंप, त्सुनामी, वादळ व अन्य नैसर्गिक आपत्ती अतिशय कमी राहतील. भेंडवळच्या भाकितानुसार देशात परकीय घुसखोरीची अधिक शक्यता आहे. सत्ता व राजा कायम राहणार असून त्यांच्यावर प्रचंड ताणतणाव राहील. देशाची वाणिज्य व आर्थिक परिस्थिती अतिशय उत्तम राहणार आहे. परकीय घुसखोरी व आक्रमणामुळे सुरक्षा व्यवस्थेवर अधिक ताण राहणार असून त्यांना सतर्क राहावे लागणार आहे. घटमांडणीतील सांडोळी व कुरडई हे जनावरांच्या चारापाण्याचे प्रतीक आहे. ते स्थिर राहल्याने पाणी व चाराटंचाई राहणार नाही. यावर्षी हे ठीक असल्यामुळे जनावरांना पाणी व चाऱ्याची टंचाई भासणार नाही. करवा हे समुद्राचे प्रतीक असल्यामुळे ते संपूर्ण भरलेले राहिल्याने पाणीटंचाई अजिबात जाणवणार नाही.   
विज्ञान व तंत्रज्ञानाने प्रचंड झेप घेतलेली असतांना, तसेच हवामान व पर्जन्यमानशास्त्रात नवे आयाम येत असतांनाही पाऊस व पर्जन्यमान, नैसर्गिक आपत्ती यासह सर्व शास्त्रीय अंदाज चुकत असतात. अशा पाश्र्वभूमीवर भेंडवळच्या घटमांडणीच्या ठोकताळ्यावर आजही लाखो शेतकरी विश्वास ठेवतात. त्याला श्रध्दा म्हणावे की अंधश्रध्दा, याबद्दल मतमतांतरे आहेत.
घटमांडणीचे ठळक ठोकताळे
येणाऱ्या जूनमध्ये साधारण, जुलमध्ये चांगला, ऑगस्टमध्ये भरपूर, तर सप्टेंबरमध्ये साधारण पाऊस राहील. सप्टेंबरमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे. पेरणी जूनमध्ये म्हणजे वेळेवर होईल. सत्तेवर संकट नाही. राजा स्थिर पण, तणावात राहील. परकीय घुसखोरीची शक्यता असून देशाची आर्थिक स्थिती उत्तम राहील. घटमांडणीला ३५० वर्षांंची परंपरा आहे. चंद्रभान महाराजांनी ही घटमांडणी सुरू केली. तिची परंपरा त्यांच्या वंशजांनी सुरू ठेवली. या घटमांडणीवर विदर्भ व महाराष्ट्रातील शेतकरी विश्वास ठेवतात. या मांडणीवरच आता बियाणे कंपन्या त्यांच्या बियाण्यांचे मार्केटिंगही करू लागल्या आहेत, हे विशेष.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sufficient rain this year but cotton doubtful
First published on: 16-05-2013 at 02:36 IST