ऊस भावप्रश्नी गेले काही दिवस सुरू असलेले आंदोलन थांबण्याचे नाव घेत नसल्याचे दिसते. भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील ऊसउत्पादक शेतकऱ्यांना उसाचा वाढीव दर मिळावा, या मागणीसाठी मनसे सरसावल्यानंतर कारखान्याच्या चारही ऊसपुरवठा विभाग कार्यालये पेटवून देण्याचा प्रयत्न मंगळवारी पहाटे घडला. मात्र, कोणत्याही संघटनेने या घटनेची जबाबदारी स्वीकारली नाही. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुध्द गुन्हा दाखल केला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजीव शेट्ठी यांच्या नेतृत्वाखाली राज्यात ऊस दरवाढ मिळाली पाहिजे, या मागणीसाठी तीव्र आंदोलन करण्यात आले. खासदार शेट्टी यांनी भाऊराव कारखाना कार्यक्षेत्रात सुरू झालेल्या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी झाल्यानंतर आंदोलनाला काही प्रमाणात िहसक वळण लागले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हे आंदोलन मागे घेतल्यानंतर वातावरण शांत झाले होते.
दरम्यान, ऊसउत्पादक शेतकऱ्यांना ऊस दरवाढ मिळालीच पाहिजे, या मागणीसाठी मनसेच्या बारड परिसरातील कार्यकर्त्यांनी कार्यकारी संचालक व अध्यक्ष यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले होते. मागणी मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला होता.
भाऊराव कारखान्याची अर्धापूर, नांदेड, बारड व मालेगाव येथे ऊसपुरवठा विभाग कार्यालये आहेत. या कार्यालयांतून ऊस तोडणी कार्यक्रम राबविला जातो. कार्यालयांत स्लीप बॉय व इतर अधिकाऱ्यांचे नेहमी वास्तव्य असते. मनसेच्या वतीने निवेदन दिल्यानंतर रात्रीतून कारखान्याची चारही विभाग कार्यालये पेटवून देण्याचा प्रयत्न झाला.
विभाग कार्यालयाच्या मुख्य दारातून पेट्रोलमिश्रीत कापडी बोळे टाकून आग लावण्यात आली. त्यामुळे लागलेल्या आगीत कार्यालयाची दारे, खिडक्या जळाल्या. कार्यालयातील कागदपत्रे मात्र सुखरूप आहेत. या घटनेचा संबंध मनसे कार्यकर्त्यांशी जोडला जाऊ शकतो काय, त्याचा तपास अर्धापूर पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे कारखाना प्रशासनात एकच खळबळ उडाली.