शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणात योग्य नियोजनाअभावी शहरवासीयांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याच्या पाश्र्वभूमीवर, शहराच्या हद्दीतील उड्डाण पुलाखालील सव्‍‌र्हिस रस्त्यांच्या सर्वेक्षणाचे काम राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाने हाती घेतले आहे. क. का. वाघ महाविद्यालय ते गरवारे पॉइंट या उड्डाण पुलाखालील सव्‍‌र्हिस रस्त्यांवरील स्थितीचे अवलोकन करण्यात येत आहे. या मार्गावरील प्रत्येक चौकात ये-जा करणाऱ्या वाहनांची स्थिती लक्षात घेऊन कुठे काय उपाययोजना करता येईल यावर विचार केला जाणार आहे.
महामार्गाच्या विस्तारीकरणांतर्गत शहरात साकारलेल्या लांबलचक उड्डाण पुलामुळे वाहतुकीच्या समस्या कमी होण्याऐवजी त्यात भरच पडल्याचे दिसून येते. या पुलामुळे शहर सरळ दोन भागांत विभागले गेले. त्यात महामार्गालगतच्या काही भागांसाठी रस्ता ओलांडण्याची सोय राहिली नाही. द्वारका चौकात पादचारी मार्ग साकारला गेला असला तरी त्याचा वापर होत नाही. मुंबई नाका परिसरात विस्तीर्ण बेट तयार करून नेमके काय साधले याचे कोडे अद्याप उलगडलेले नाही. गोविंदनगर चौफुलीवरून एकाही वाहनधारकाची कोंडीतून सुटका होत नाही. सव्‍‌र्हिस रस्ते काही ठिकाणी अतिशय अरुंद असल्याने अपघाताची शक्यता वाढली. ही एकूणच स्थिती लक्षात घेऊन आ. प्रा. देवयानी फरांदे यांनी उड्डाण पुलामुळे निर्माण झालेल्या समस्यांचे निराकरण करण्याची मागणी केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेऊन केंद्रीय महामार्ग विकास प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी सलग दोन वेळा पाहणी केल्यावर शहराच्या हद्दीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सर्वेक्षणाचे काम हाती घेतले आहे.
उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर आजपर्यंत पूल आणि सव्‍‌र्हिस रस्ते यावरील अपघातांत अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. शहरवासीयांची कोंडीतून मुक्तता झाली नाही. या प्रश्नाची केंद्रीय भूपृष्ठ मंत्रालयाने दखल घेतल्यानंतर समस्यांचे निराकरण करण्यासाठी सर्वेक्षणाचे काम सुरू झाले आहे. प्रत्येक चौकातून दररोज किती वाहने मार्गस्थ होतात, त्या ठिकाणी नेमकी काय समस्या भेडसावते याचा अभ्यास करून काय उपाययोजना करता येईल याचा अभ्यास केला जात असल्याचे प्राधिकरणाचे अधिकारी पी. जी. खोडस्कर यांनी सांगितले.

नियोजनातील चुका दुरुस्तीसाठी पाठपुरावा
उड्डाण पूल साकारताना योग्य नियोजनाअभावी अनेक समस्या भेडसावत आहेत. त्यास राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाच्या चुका कारणीभूत आहेत. गोविंदनगर चौफुलीवर दोन्ही बाजूला चारपदरी रस्ते आहेत. असे असूनही या चौकातील भुयारी मार्ग दुपदरी ठेवला गेला. त्यातच, चौकालगत उड्डाण पुलावर ये-जा करण्याची व्यवस्था करणे हे देखील चुकीचे ठरले. या त्रुटींमुळे आज या परिसरात कमालीच्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. वास्तविक हा भुयारी मार्ग चारपदरी करणे आवश्यक आहे. द्वारका चौकात तर खुद्द प्राधिकरणाने नाशिक-पुणे मार्गावरील काही भागावर अतिक्रमण केले. या चौकातील अतिक्रमणे हटवून मार्ग विस्तृत करण्याऐवजी त्या ठिकाणी भुयारी पादचारी मार्ग करण्यात आला. त्याचा वापरही पादचारी करत नाही. परिसरातील अतिक्रमणे आणि चुकांचा भरुदड वाहनधारकांना सोसावा लागत आहे. सव्‍‌र्हिस रस्त्यांवरील विविध त्रुटींकडे लक्ष वेधल्यानंतर प्राधिकरणाने सर्वेक्षणाचे काम हाती घेतले आहे.
आ. प्रा. देवयानी फरांदे