मान्यताप्राप्त खासगी प्राथमिक शाळांतील शिक्षक, शिक्षके तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या शासन दरबारी मांडण्यासाठी  महाराष्ट्र राज्य मान्यताप्राप्त शिक्षक शिक्षकेतर महासंघाच्या जिल्हा शाखेतर्फे शनिवारी सकाळी १०.३० वाजता येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्ह्यातील सर्व खासगी प्राथमिक शिक्षक व कर्मचाऱ्यांचा मोर्चा काढण्यात येणार आहे.
शासन मान्यताप्राप्त खासगी प्राथमिक शाळांतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आजवर अनेक प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत. कायमस्वरूपी विनाअनुदानित धोरण बंद करावे, खासगी प्राथमिक शाळांतील बालवाडी शिक्षिका व कर्मचाऱ्यांना शासनामार्फत वेतनश्रेणीनुसार वेतन त्वरित मिळावे, मूल्यांकनाच्या अटी शिथील कराव्यात, वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी विनाअनुदानित सेवा ग्राह्य़ धरावी, दोनशेपेक्षा अधिक पटसंख्या असल्यास एक लिपीक आणि एक शिपाई पद मंजूर करावे, वेतनेतर अनुदान त्वरित मिळावे, २४ वर्षे वेतनश्रेणीसाठी पदवीधर आणि २० टक्क्यांची अट रद्द करावी, दुप्पट संख्येस एक तुकडी व शिक्षक पदास मंजुरी मिळावी, शिक्षण सेवक योजना बंद करून वेतनश्रेणीप्रमाणे पदास मान्यता मिळावी, यांसह इतर  मागण्या करण्यात आल्या आहेत. मोर्चा शहरातील लायन्स नूतन प्राथमिक शाळा, महात्मा गांधी पुतळ्यापासून सुरू होणार आहे.
यावेळी मोर्चेकऱ्यांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर करणार आहेत. त्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत होईल. या मोर्चात जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त खासगी प्राथमिक शाळांतील कर्मचाऱ्यांनी तसेच बालवाडी कर्मचाऱ्यांनी अधिकाधिक संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य मान्यताप्राप्त खासगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघाचे राज्य उपाध्यक्ष विजयकुमार ढोबळे यांनी केले आहे.