किशोरवयीन मुले क्षुल्लक कारणावरून पालकांशी भांडतात. अनेक प्रसंगी रागाने घराबाहेर पडतात. घराबाहेर पडल्यावर डोक्यात असलेला राग शांत होताच काही जण घरी परततात. पण हा राग शांत होईपर्यंतच्या काळात काहीही विपरीत घडू शकते. या अंधाराची प्रचीती देणाऱ्या दोन घटना नुकत्याच मुंबईत घडल्या. त्यापैकी एक मुलगी गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या मदतीने घरी परतली. दुसऱ्या घटनेतही मुलगी घरी परतली, पण उद्ध्वस्त होऊन..
दिल्लीत राहणारी खुशबू पांडे (१३) (नाव बदललेले) ही आठवीत शिकणारी मुलगी. गरीब घराणे. तिचे वडील खासगी ट्रॅव्हल कंपनीत वाहनचालक म्हणून काम करतात. खुशबूला दोन लहान भावंडे. मोबाइल घेऊन देण्याच्या वादातून तिचे आईशी भांडण झाले आणि त्या रागात तिने घर सोडले. जून २०१४ मधील ही घटना. तिच्या डोक्यात राग होता. अशीच ती बाहेर फिरत असताना एका माणसाने तिला पाहिले आणि त्याच्या नजरेने तिची अवस्था हेरली. त्याने प्रेमाने विचारपूस करण्याचे नाटक करत तिला आपल्या घरी आणले. तिला घरी परत पाठवण्याऐवजी तिला खोटी स्वप्ने दाखवली. तेरा वर्षांच्या नकळत्या वयात तिला ते सारे खरे वाटले. एक भला माणूस भेटला असेच तिला वाटत होते. त्याने तिला मुंबईत चांगले शिक्षण, काम आणि भरपूर पैशांची नोकरी देण्याचे स्वप्न दाखवले. ती त्याच्या जाळ्यात फसत गेली. त्याने खुशबूला मुंबईला आणले. आयुष्यात प्रथमच ती मुंबईत आली. मुंबईत आणल्यावर त्याने तिला ठाण्यातील बेडिया नावाच्या एका दाम्पत्याला विकले. या जोडप्याने तिला घराबाहेर जाण्यास आणि कुणाशी बोलण्यास मज्जाव केला होता. खुशबू पुरती फसली होती. पण काहीच करू शकत नव्हती. त्यांनी तिला ठाण्यातील एका बारमध्ये कामाला लावले. चार महिन्यांचा काळ निघून गेला होता. दररोज तिचे वडील दिल्ली पोलीस ठाण्यात जाऊन ‘माझ्या मुलीला शोधा’ असा टाहो फोडत होते. एक दिवस खुशबूने संधी साधून त्या घरातून फोन केला. पण तिला पुढे काही बोलता आले नव्हते. दरम्यान, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा ७च्या पथकाने केवळ आलेला फोन हाच दुवा समजून शोध सुरू केला. त्या फोनचे लोकेशन, सीडीआर तपासले आणि बेडिया यांच्या घरी थडकले. मागील आठवडय़ात खुशबूची सुखरूप सुटका झाली आणि ती पुन्हा आईवडिलांकडे परतली. अशा पद्धतीने मुलींना फसवून त्या मोठय़ा झाल्यावर देहविक्रीच्या व्यवसायात आणणारी टोळी कार्यरत असून खुशबू त्याचीच बळी ठरणार होती. पण सुदैवाने तिला वेळेत सोडवण्यात आम्ही यशस्वी ठरलो, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट पाटील यांनी सांगितले.
प्रियांका (नाव बदललेले) ही १४ वर्षीय शालेय विद्यार्थिनी. एका श्रीमंत व्यापाऱ्याची मुलगी. एकेदिवशी आजीशी भांडण झाले आणि तावातावात ती चर्नी रोड येथील घरातून बाहेर पडली. डोक्यात राग होता आणि त्या अवस्थेत ती आझाद मैदान परिसरात फिरत होती. एका रिक्षा चालकाने तिला हेरले. काही वेळ माझ्या घरी बस मग घरी सोडतो, असे आश्वासन दिले. ती त्याला फसली. त्या रिक्षाचालकाने मग तिला गोवंडी येथील एका चाळीतील आपल्या घरी नेले आणि मग तिच्यावर बलात्कार केला. या रिक्षाचालकाने मग तिला तिच्या घराजवळ सोडून पळ काढला. आझाद मैदान पोलिसांनी नंतर त्या नराधमाला अटक केली, पण रागाच्या भरात घराबाहेर पडण्याचा निर्णय तिचे आयुष्य उद्ध्वस्त करून गेला.
पौगंडावस्थेतील मुला-मुलींचे मन खूपच संवेदनशील असते. त्या वयात घरात सुसंवाद नसला की छोटय़ाशा घटनेतून मुले टोकाचा निर्णय घेतात. त्यातून आयुष्यभराचे नुकसान कसे होऊ शकते याचाच प्रत्यय या दोन्ही घटनांच्या निमित्ताने पुन्हा एकदा आला.