सापाचे विष काढून त्याची तस्करी करणारी सर्पमित्रांची टोळीच या जिल्ह्य़ात सक्रीय असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून सर्पमित्र सुशील सिरसाठ (२९, रा. वरोरा) याला सापाचे विष काढण्याच्या साहित्यासह स्थानिक वनाधिकाऱ्यांच्या मदतीने अकोल्यातील सर्प विष तस्करी पथकाने आज अटक केल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, या तस्करीचा मुख्य सूत्रधार मुंबईत असल्याचे तपासात समोर आले आहे.
वनसमृध्दीने संपन्न या जिल्ह्य़ात वन्यप्राण्यांसह पशूपक्षी, फुलपाखरे व सरपटणाऱ्या प्राण्यांचे वास्तव्य आहे. याच सरपटणाऱ्या प्राण्यांपैकी नाग व सापाचे विष काढून त्यांची मोठय़ा प्रमाणात तस्करीत करण्यात येत असल्याची माहिती आता समोर आली आहे. यात दुसरे तिसरे कुणीही नसून खुद्द सर्पमित्रांचाच सहभाग असल्याचेही निष्पन्न झाले आहे. सापाचे विष विकणारी टोळी राज्यात सक्रीय असून त्याचे मुख्य केंद्र चंद्रपूर जिल्हा असल्याचे व वरोरा येथील सर्पमित्रांशी नाळ त्याच्याशी जुळली असल्याची माहिती मानद वन्यजीवरक्षक अशोक तेलकर यांनी मानद वन्यजीवरक्षक बंडू धोतरे यांना दिली. या माध्यमातून अकोला येथील सर्प विष प्रकरणाचे धागे वरोरा वनपरिक्षेत्राशी जुळले असल्याची माहिती विभागीय वनाधिकारी एन.डी. चौधरी यांना मिळताच त्यांनी दिली. याप्रकरणी अकोला वन विभागाने चार आरोपींना ३५ मि.ली. सापाच्या विषाची विक्री करतांना अटक केली होती. विभागीय वनाधिकारी चौधरी यांनी नेमका हाच धागा पकडून तपासाला सुरुवात केली व सुनील सिरसाठ यांच्यावर पाळत ठेवली. वरोराचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर.एम.तलांडे, वनपाल लालसरे, वनरक्षक औतकर यांनी आरोपीवर चोवीस तास लक्ष ठेवल्यानंतर या घटनेची गंभीरता लक्षात घेऊन चौधरी यांनी वनाधिकारी व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन सर्पमित्र सुशील सिरसाठ यांना वरोऱ्यातील त्यांच्या डॉ.हेलन केलननगरातील राहते घरातून सापाचे विष काढण्याचे साहित्य, व्हॉलीबॉलचे ब्लॅडर, दोरी, सिरिंज आदी साहित्य जप्त केले.
व्हॉलीबॉल ब्लॅडरला सापाचे विष लागल्याचे स्पष्ट आढळून आले. त्यानंतर सुशील सिरसाठ यांनी ५ मे ते १९ जून २०१३ या कालावधीत वरोरा, सालोरी, परसोडा, सुर्ला या वरोरा तालुक्यातील गावांमध्ये लोकांच्या घरातील जवळपास १५ नाग प्रजातीचे साप पकडले होते. नंतर त्यांनी ३ ते ४ इंच लांब व दोन इंच रुंद काचेच्या बाटलीवर व्हॉलीबॉलचे ब्लॅडरचे रबर बारीक सुताच्या दोरीने बांधले होते व त्यावर सापांचे दंश करून सापाचे १५ मि. लि. विष बाटलीत जमा केले होते. या सापाचे विष विश्वजीत वानखेडे (रा. नागपूर) यांना १९ जूनला सायंकाळी चार वाजता विक्रीसाठी हस्तांतरित केले होते. सर्पविष तस्करीचे मुख्य सूत्रधार मुंबईत असल्याचे तपासात समोर आले आहे.
अकोला वन विभागाचे वनपाल ग.म.खोपडे यांनी आरोपीला अटक करून अकोला येथे न्यायालयात हजर करण्यासाठी पाठविले आहे. दरम्यान, या टोळीत सक्रीय असलेल्या   इतर   सर्पमित्रांचाही वनखाते शोध घेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The snake poison smuggling gang active in chandrapur
First published on: 22-06-2013 at 01:25 IST