‘स्टार प्रवाह’ वाहिनीतर्फे ठराविक कालावधीनंतर रसिकप्रेक्षकांशी थेट संवाद साधतील असे कार्यक्रम केले जातात. ‘अनुभूती’ या कार्यक्रम मालिकेद्वारे भारतीय संगीत लोकांपर्यंत पोहोचविण्यात येते. याअंतर्गत अलिकडेच सुप्रसिद्ध शास्त्रीय व नाटय़संगीत गायक पंडित जितेंद्र अभिषेकी यांची गायकी आणि त्यांचे व्यक्तिमत्व उलगडून दाखविणारा कार्यक्रम ‘अनुभूती’मध्ये सादर करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे प्रक्षेपण रविवार, २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर होणार आहे.
पं. जितेंद्र अभिषेकी यांच्याविषयीची वेगळी माहिती या कार्यक्रमातून लोकांपर्यंत पोहोचेल. ‘अनुभूती’ कार्यक्रमाद्वारे ‘अभिषेकीयुग’ पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पं. जितेंद्र अभिषेकी यांचे पुत्र शौनक अभिषेकी, राहुल देशपांडे, पं. रघुनंदन पणशीकर, अभिजीत पोहनकर, सुमेधा देसाई, गौरी पाठारे, मृदूला तांबे आदी गायक-गायिका पं. अभिषेकी यांचे संगीत नव्या ढंगात सादर करतील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता सुबोध भावे यांनी केले आहे.