राज्याच्या तुलनेत नाशिक जिल्ह्य़ात उत्स्फूर्त प्रतिसाद
वेगवेगळ्या उत्पादनांचा वापर, आहारतज्ज्ञांच्या सल्ल्याने तब्येत सुधारण्यासाठी होणारे प्रयत्न अशा विविध पर्यायांची सरमिसळ करून आरोग्याची हेळसांड होण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे किशोरावस्थेतच मुला-मुलींचे आरोग्य चांगले व्हावे याकरिता केंद्र शासनाच्या सहकार्याने नाशिक जिल्ह्यात ‘वीकली आयर्न फॉलिक अॅसिड सप्लिमेंटेशन’ (व्हिफ्स) उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचे यंदा दुसरे वर्ष असून त्या अंतर्गत शासकीय शाळा, आश्रमशाळा व शाळाबाह्य़ अशा तब्बल चार लाख जणांपर्यंत पोहचण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. पुढील टप्प्यात अनुदानित, विनाअनुदित शाळांमध्ये पोहचण्याचा प्रयत्न आहे.
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत देशातील माध्यमिक शाळांमध्ये गेल्या काही वर्षांत व्हिफ्स उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत १५ ते १९ वयोगटातील मुला-मुलींना लोहयुक्त अशा फॉलिक अॅसिडच्या गोळ्या आठवडय़ातील एका ठरावीक दिवशी देण्यात येतात. हा उपक्रम संबंधित शाळांमध्ये ५२ आठवडे सुरू राहील. या गोळ्यांमुळे रोगप्रतिकारशक्ती, हिमोग्लोबीनचे प्रमाण आणि शारीरिक वाढीस लाभ होणार आहे. नाशिक जिल्ह्यात हा उपक्रम एप्रिल २०१३ मध्ये सुरू झाला राज्याच्या तुलनेत नाशिक जिल्ह्यात त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. त्याकरिता नाशिक जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग प्रयत्नरत आहे. उपक्रमाचे महत्त्व, त्याची गरज अधोरेखित करणारे गीत जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी तयार केले. या संदर्भात संबंधितांना उपक्रमाचे महत्त्व, तो राबविताना घ्यावयाची काळजी, त्यातील काही धोके याबद्दल प्रशिक्षण देण्यात आले. त्यात गटशिक्षण अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, एकात्मिक बाल विकास अधिकारी, अंगणवाडी सेविका आदींचा समावेश आहे.
गोळीतील लोह व फॉलिक अॅसिडचे प्रमाण
पाहता मुला-मुलींना माध्यान्ह भोजनानंतर ही गोळी देण्याची सक्ती करण्यात आली. तसेच गोळ्या घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे पाठपुरावा कार्ड भरून घेतली जात आहेत.
मुला- मुलींना देण्यात येणारा पोषक आहार, पिण्याचे पाणी, शाळांमधील स्वच्छता आदींचा अभ्यास या माध्यमातून होत आहे.
या शिवाय विद्यार्थ्यांमध्ये जीवनकौशल्ये विकसित व्हावी, त्यांनी व्यसनापासून दूर राहावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
कमी वयात होणारे लग्न, त्यात बाळंतपणे, माता बाल मृत्यू यात रक्तक्षय महत्त्वाची भूमिका बजावतो. या उपक्रमाद्वारे माता-बाल मृत्यूवर नियंत्रण आणता येऊ शकते. यासाठी शाळा बाह्य़ मुलींशी अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून संपर्क साधणे सुरू आहे. जिल्ह्यात सध्या इगतपुरी, नाशिक, देवळा, बागलाण, पेठ, कळवण, येवला, नांदगाव, सिन्नर, मालेगाव, निफाड, चांदवड, दिंडोरी, सुरगाणा आणि त्र्यंबक येथील शासकीय शाळा व आश्रमशाळांमध्ये हा उपक्रम सुरू आहे. नजीकच्या काळात अनुदानित, विनाअनुदानित शाळांमध्ये पोहचण्याचा
प्रयत्न असल्याचे डॉ. साळे यांनी सांगितले.

तीन लाख ९२ हजार जणांना लाभ
नाशिक जिल्ह्यात राबविल्या जाणाऱ्या ‘व्हिफ्स’ उपक्रमात सध्या १, ८१, २१७ मुले तर १, ५६, ७०८ मुली तसेच ४३,४६३ शाळा बाह्य विद्यार्थी सहभागी झाले आहेत. या व्यतिरिक्त त्यात ६,१४८ शिक्षक आणि ४, ९४१ अंगणवाडी सेविकाही समाविष्ट झाल्या आहेत. संपूर्ण जिल्ह्यात उपक्रमात एकूण तीन लाख ९२ हजार ४७६ जण सहभागी झाले आहेत.