केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापाठोपाठ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उद्या (मंगळवारी) मराठवाडय़ात येत आहेत. चव्हाण बीड जिल्हय़ाच्या दौऱ्यावर येणार आहेत. एकाच आठवडय़ातील प्रमुख नेत्यांच्या दौऱ्यांमुळे प्रशासकीय यंत्रणेची चांगलीच धावपळ झाली. प्रमुख नेत्यांचे किती दौरे व्हावेत, याविषयी चिंतन करण्याची गरज असल्याची टिप्पणी खुद्द शरद पवार यांनीच अधिकाऱ्यांसमोर व्यक्त केल्याचे सूत्रांकडून समजते. लातूर व उस्मानाबाद जिल्हय़ांतील भूकंपाच्या वेळी तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांना भूकंपग्रस्त भागाचा दौरा करायचा होता. तथापि, तेव्हाची स्थिती लक्षात घेता पंतप्रधानांनी येऊ नये, अशी विनंती करण्यात आली होती आणि ती मान्य केल्याची आठवण पवारांनी बैठकीत सांगितली. पवारांच्या या टिप्पणीच्या पाश्र्वभूमीवर मराठवाडय़ातील दौरे चर्चेचा विषय ठरू लागले आहे.
दरम्यान, उद्या राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे सिल्लोड, भोकरदन व गेवराई तालुक्यांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यांमुळे मराठवाडय़ाच्या पदरात नेमके काय पडणार, याची उत्सुकता आहेच. तथापि, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी असे दौरे भंपक असल्याची केलेल्या टीकेला शरद पवार यांनी महत्त्व दिले नाही. या अनुषंगाने प्रश्न विचारणाऱ्या माध्यमांच्या प्रतिनिधींवरच ते डाफरले. त्यांच्याविषयीचे प्रश्न मला का विचारता, असे म्हणत त्यांनी विषय टाळला. अशा दौऱ्यांमधून योजनांचे निकष बदलले जातात. त्याचा फायदा सर्वसामान्यांना होतो, असे ते वैतागून म्हणाले.
यंदा भयावह दुष्काळाने मराठवाडय़ात अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली असून, तोंडचे पाणी पळाले आहे. जायकवाडीच्या पाण्याचा मुद्दा राजकीय आखाडय़ात बराच गाजला. अखेर आधी नोव्हेंबरमध्ये भंडारदरा धरणातून अडीच टीएमसी व नंतर पुन्हा डिसेंबरात नगर व नाशिक जिल्हय़ांतील धरणांतून अनुक्रमे सहा व तीन टीएमसी पाणी सोडण्यात आले. मात्र, या नऊ टीएमसीपैकी प्रत्यक्षात साडेचार टीएमसी पाणी जायकवाडीत दाखल झाले.
दिवसेंदिवस तीव्र होत चाललेल्या दुष्काळी स्थितीत सत्ताधाऱ्यांना जेरीस आणण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ३ फेब्रुवारीला ‘दुष्काळग्रस्त मराठवाडय़ाचा आक्रोश’ या नावाखाली जालन्यात मोठा मेळावा घेतला. या मेळाव्याची चर्चा असतानाच भाजपनेही ज्येष्ठ नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांचे धावते दौरे आयोजित करून राज्यातील सत्ताधारी आघाडीविरोधात हवा तापती ठेवली. नेत्यांच्या या भेटीमधून निव्वळ आश्वासनापलीकडे मराठवाडय़ाच्या पदरात काही पडले नाही. उद्याच (मंगळवारी) मुख्यमंत्री चव्हाण हेही बीडच्या दौऱ्यावर सकाळी साडेनऊ वाजता येत आहेत. या दौऱ्यात दुष्काळी स्थितीची आढावा बैठक घेऊन ते बुलढाण्याकडे रवाना होणार आहेत. मुख्यमंत्री आष्टी तालुक्यातील जनावरांच्या छावण्या व काही कामांना भेटी देणार असल्याचे सांगितले जाते.