आषाढी व कार्तिकी यात्रांसह दररोज विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येणाऱ्या वारकरी तथा भाविकांसाठी तीर्थ विकास आराखडय़ाअंतर्गत दोन हजार शौचालये बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी शासनाने एक समिती गठीत केली असून या समितीच्या सदस्यांनी जागांची पाहणी केली.
पंढरपुरात दरवर्षी आषाढी, कार्तिकी या दोन मोठय़ा यात्रांसह माघी व चैत्री यात्रा भरतात. या चारही लहान-मोठय़ा यात्रांमध्ये मिळून वर्षभरात सुमारे एक ते दीडकोटी वारकरी तथा भाविक पंढरपुरात येतात. या भाविकांच्या सोईसाठी सध्या पंढरीत सुलभ शौचालय संस्थेच्या धर्तीवर १५ ते १६ ठिकाणी तब्बल दोन हजार शौचालये बांधण्यात येणार आहेत.
या शौचालयांच्या उभारणीसाठी सध्या पंढरपूर नगरपालिकेकडे सात जागा उपलब्ध आहेत. सहा जागा येत्या दीड-दोन महिन्यात उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. तर दोन ते तीन भूखंड मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. शासनाने शौचालयांच्या बांधकामासाठी विनानिविदा कंत्राट देण्यास मान्यता दिली आहे. दरम्यान, तीर्थ विकास आराखडा समिती गठीत झाल्याने शौचालयांच्या उभारणीचे काम वेगाने सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. या शौचालयांची सुविधा उपलब्ध झाल्यास वारकऱ्यांची सोय होणार असून शिवाय पंढरीत चंद्रभागेच्या वाळवंटात स्वच्छता राहण्यास मोठी मदत होणार आहे.