जिने चढतेवेळी लागलेल्या धापेमुळे पनवेल रेल्वे स्थानकात शनिवारी सकाळी दहा वाजता एका प्रवासी महिलेचा मृत्यू झाला. या रेल्वे स्थानकात सरकते जिने नाहीत, मालवाहू रॅम्प नाही, प्रथमोपचारासाठी रुग्णवाहिका नाही, रुग्णाला उचलण्यासाठी असणाऱ्या तात्पुरती खाटेसाठी लागलेल्या विलंबामुळे  शनिवारी नीला खारा यांचा मृत्यू झाल्याचे प्रवासी सांगतात. मात्र महिन्याला पाच कोटी रुपयांची तिकीट खरेदी करून रेल्वेचा गल्ला फुल करणाऱ्या स्थानकामध्ये प्रवाशांच्या सोयीकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्षाचे उत्तम उदाहरण शनिवारी प्रवाशांनी डोळ्यादेखत पाहिले. गेल्या वर्षभरापासून पनवेल स्थानकाचे प्रशासन, प्रवासी संघ यांनी रेल्वे प्रशासनाकडे सरकते जिने, मालवाहू रॅम्पची मागणी केली. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याने रेल्वे प्रवाशांवर मृत्यूची घंटा घोघावू लागली आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची कृपादृष्टी होईल या आशेवर पनवेलचे प्रवासी आहेत.
नीला खारा शिरढोण येथे राहणाऱ्या आहेत. त्यांच्याकडे असणाऱ्या सामानासह त्या फलाटावरील जिने चढताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. फलाटावर त्या कशाबशा पोहचल्यावर त्यांनी आपल्या मुलाशी व चालकाशी संपर्क साधला. त्यानंतर रुग्णाला उचलण्यासाठी रुग्णपटाची (रुग्णाला नेण्याची झोळी) शोधाशोध सुरू झाली. रुग्णपट नीला यांच्यापर्यंत पोहोचेपर्यंत उशीर झाला होता. मात्र नीला यांचा श्वासोच्छवास सुरू असल्याचे त्यांचे पती महेंद्र यांनी सांगितले.  रेल्वे स्थानकाबाहेर कोणतीही रुग्णवाहिकेची सोय नसल्याने पनवेलमधील लाइफलाइन रुग्णालयापर्यंत पोहोचण्यासाठी विलंब झाला आणि येथील डॉक्टरांनी नीला यांना मृत घोषित केले. महेंद्र खारा यांचा  निरोप घेऊन आईकडे जाणाऱ्या नीला आज रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभारामुळे राहू शकल्या नाहीत, असे मत महेंद्र यांचे नातेवाईक शैलेंद्र पाटील यांनी व्यक्त केले आहे. ६ फेब्रुवारीला रेल्वेचे जनरल मॅनेजर सुनीलकुमार सूद यांनी पनवेल रेल्वेस्थानकाला भेट दिली. सूद येणार म्हणून स्थानक शक्य तेवढ स्वच्छ करण्यात आले होते. मात्र येथील प्रवाशांच्या हितासाठी रेल्वेने सूद यांच्या भेटीव्यतिरिक्त कोणतीही योजना येथे राबविली नव्हती. सूद आले नि गेले असेच येथे बोलले गेले. रेल्वे स्थानकाचे व्यवस्थापक डी. के. गुप्ता यांना शनिवारच्या घटनेबद्दल विचारल्यावर त्यांना नीला खारा यांच्या मृत्यूची घटना माहीत नसल्याचे उजेडात आले. नीला यांच्या मृत्यूनंतर तरी स्थानक व्यवस्थापकांच्या प्रस्तावावरील धूळ झटकून पनवेलमध्ये सरकते जिने व प्रवाशांच्या पायाभूत सुविधेचा गांभीर्याने विचार करावा, असे मत प्रवासी संघाचे अध्यक्ष डॉ. भक्तीकुमार दवे यांनी व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे रेल्वेच्या मागील वर्षीच्या अर्थसंकल्पापूर्वीपासून पनवेलच्या प्रवासी संघाने ही मागणी केली आहे. रेल्वे व प्रवासी यांच्यातील प्रत्येक बैठकीत ही मागणी लेखी स्वरूपात केल्याचे डॉ. दवे यांनी सांगितले. पनवेल रेल्वे स्थानकातून महिन्याची तिकीट विक्री पाच कोटी रुपयांची होते. लाखो प्रवाशांच्या सोयीसाठी कायदेशीर येथे एकाच हमालाची नेमणूक केलेली आहे. येथे किमान २० हमालांची आवश्यकता आहे. सध्या येथे सहा हमाल बेकायदा काम करतात, पण तीच प्रवाशांची सोय आहे.