पराभव झाल्यामुळे, मतदारसंघ बदलल्यामुळे किंवा इतर काही कारणाने ज्यांनी सलग विधानसभेत निवडून जाण्याचा विक्रम केला असता, अशा काही उमेदवारांची विजयाची परंपरा खंडित झाली आहे.
काँग्रेसचे ‘हेवीवेट’ नेते आणि माजी मंत्री सतीश चतुर्वेदी पूर्व नागपूर मतदारसंघातून सर्वप्रथम १९८०मध्ये काँग्रेसतर्फे निवडून आले. पुढच्या निवडणुकीत बंडखोरी केल्याने पराभूत झाले. त्यानंतर १९९० सालापासून ते सतत निवडून येत गेले. अशारितीने पाचवेळा त्यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केल्याने हा मतदारसंघ त्यांचा अभेद्य गड समजला जात होता. परंतु २००९ मध्ये भाजपच्या एका सामान्य कार्यकर्त्यांने त्यांची धूळधाण केली. सहाव्यांदा निवडून येण्याच्या विक्रमापासून चतुर्वेदी वंचित राहिले. विजयाच्या आशेने यंदा दक्षिण नागपूर मतदारसंघात त्यांनी उडी घेतली खरी. मात्र, पुन्हा एकदा भाजपच्या एका सामान्य कार्यकर्त्यांने त्यांची धूळधाण केली.
चिखलीतून भाजपच्या रेखा खेडेकर यापूर्वीच्या तीन निवडणुकांमध्ये निवडून आल्या होत्या, परंतु २००९ मध्ये पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनाही चौथ्यांदा आमदार होण्याची संधी मिळाली नाही. शिवसेनेचे गुलाबराव गावंडे हे तर कारंजा, बोरगाव व अकोट हे तीन मतदारसंघ बदलूनही प्रत्येकवेळी निवडून आले. गेल्यावेळी अकोला (पूर्व) मतदारसंघात मात्र ते पराभूत झाल्याने त्यांची ही परंपरा खंडित झाली. यंदाही त्यांचा पराभव झाला.
माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश बंग हे यापूर्वी सलग तीनवेळा कळमेश्वर मतदारसंघातून, तर काँग्रेसचे अनीस अहमद हे सलग तीनवेळा मध्य नागपूर मतदारसंघातून सिकंदर ठरले होते. गेल्यावेळी मात्र मतदारांनी जोरदार झटका दिल्याने ते अनुक्रमे हिंगणा आणि पश्चिम नागपूर मतदारसंघातून पराभूत झाले. यंदा अनीस पुन्हा मध्य नागपुरातून तर बंग हिंगणा मतदारसंघातून हरले. प्रकाश भारसाकळे १९९० पासून सलग तीनवेळा शिवसेनेचे उमेदवार म्हणून दर्यापूर मतदारसंघातून निवडून आले. नंतर त्यांचे ‘गॉडफादर’ नारायण राणे यांनी सेनेचा त्याग करून काँग्रेसप्रवेश केल्यामुळे भारसाकळे यांनी सेनेचा राजीनामा देऊन काँग्रेसतर्फे येथून पोटनिवडणूक लढवली. त्यातही ते चौथ्यांदा विजयी झाले. मात्र गेल्यावेळी दर्यापूर मतदारसंघ राखीव झाल्याने त्यांची कोंडी झाली. काहीही संबंध न आलेल्या अकोट मतदारसंघातून गेल्यावेळी लढून अयशस्वी झाल्याने सलग पाचव्यांदा विजयी होण्याच्या विक्रमापासून ते वंचित राहिले. यंदा मात्र त्यांचे ‘गॉड फादर’ नारायण राणे पराभूत झाले तर भारसाकळे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून येथून विजय संपादन केला.
मंगरुळपीर मतदारसंघातून सुभाष ठाकरे हे दोनवेळा राष्ट्रवादी काँग्रेसचे, तर एकवेळा अपक्ष उमेदवार म्हणून विजयी झाले होते. गेल्यावेळी ते कारंजा मतदारसंघातून लढून पराभूत झाले व त्यांना चौथ्यांदा विजयी होण्याची संधी मिळाली नाही. यंदा कारंजा मतदारसंघातून पुन्हा पराभूत व्हावे लागले. एखाद्या मतदारसंघातून यापूर्वी तीनवेळा निवडून येणाऱ्या आमदारांनाही मतदारांनी नाकारल्याची उदाहरणे आहेत. यात मोर्शीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे हर्षवर्धन देशमुख, तुमसरमधून भाजपचे मधुकर कुकडे, अहेरीतून (पूर्वीचा सिरोंचा) राष्ट्रवादी काँग्रेसचे धर्मरावबाबा आत्राम हे प्रमुख आहेत.
वामनराव चटप हे राजुरा मतदारसंघाचे यापूर्वी तीनवेळा आमदार राहिलेले आहेत, परंतु गेल्यावेळी निवडणूक न लढल्याने मतदार त्यांना चौथ्यांदा विधानसभेत पाहू शकले नाहीत. चंद्रपूरमधून लोकसभेत जाण्याचेही त्यांचे स्वप्न भंगले. काँग्रेसचे बंडू सावरबांधे हेही अडय़ाळमधून सलग तीनवेळा विजयी झाले होते, परंतु गेल्यावेळी हा मतदारसंघ बाद झाला. त्यामुळे त्यांना निवडणुकीत लढता आले नाही. तीनवेळा प्रतिनिधित्व केलेला वलगाव मतदारसंघ पुनर्रचनेत संपुष्टात आल्यामुळे शिवसेनेचे संजय बंड हे गेल्यावेळी तिवसा तर यंदा बडनेरा मतदारसंघातून लढले आणि पराभूत झाले.
अमरावती मतदारसंघातून डॉ. सुनील देशमुख, धामणगावमधून (पूर्वीचा चांदूर रेल्वे) भाजपचे अरुण अडसड, आर्वीतून अमर काळे (एकदा पोटनिवडणुकीत), साकोलीतून काँग्रेसचे सेवक वाघाये, बाळापूरमधून भाजपचे नारायण गव्हाणकर, गोंदियातून शिवसेनेचे रमेश कुथे, मेळघाटमधून भाजपचे राजकुमार पटेल, दिग्रसमधून अपक्ष संजय देशमुख, गडचिरोलीतून भाजपचे अशोक नेते व आरमोरीतून रामकृष्ण मडावी (तेव्हा शिवसेना, गेल्यावेळी बंडखोर) यांनी यापूर्वी दोनवेळा त्यांच्या मतदारसंघाचे आमदार होण्याचा मान मिळवला होता.
गेल्यावेळी मात्र हे उमेदवार त्याच मतदारसंघातून पराभूत झाले. यंदा सुनील देशमुख, अमर काळे यांना पुन्हा मतदारांनी पसंती दिली तर कुथे, पटेल, अडसड यांना नाकारले. उमरखेडमधून दोनदा निवडून आलेले भाजपचे उत्तम इंगळे यांना गेल्यावेळी आर्णी मतदारसंघातून आणि तिवस्यातून दोनवेळा निवडून आलेले भाजपचे साहेबराव तट्टे यांना मोर्शी मतदारसंघातून मतदारांनी तिसऱ्यांदा कौल दिलेला नाही. यंदाही त्यांना मतदारांनी नाकारले.